राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीची सत्तारूढ व विरोधी गटाने जोरदार तयारी केली आहे. पॅनेल बांधणी अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये नेत्यांच्या वारसदारांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. खासदार, आमदार, जिल्हा बँक, जिल्हा परिषदेनंतर आता ‘गोकुळ’ही घरातच ठेवण्याचा प्रयत्न बहुतांशी नेत्यांचा असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे.
कार्यकर्ते हेच नेत्यांची ताकद असते, त्यामुळे ज्यांनी कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडासारखे जपून त्यांना बळ दिले, तेच नेते जास्त काळ राजकारणात राहिले, हा कोल्हापूरचा इतिहास आहे. मात्र अलीकडील दहा वर्षांत नेत्यांची मानसिकता बदलली आहे. जिथे विजयाची शंभर टक्के खात्री आहे, त्याठिकाणी आपल्या घरातील व्यक्ती द्यायची आणि जिथे पराभव होणार याचा अंदाज येतो, त्याठिकाणी कार्यकर्त्याचा बळी द्यायचा, ही प्रवृत्ती अलीकडे वाढल्याचे दिसते. लोकसभा, विधानसभेपर्यंत नेत्यांनी सीमित राहावे, फार तर जिल्ह्याचे अर्थकारण हातात राहण्यासाठी जिल्हा बँकेत नेत्यांनी यावे. जिल्हा परिषद, पंचायत समितीला कार्यकर्त्याला ताकद देऊन निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी, अशी साधारणपणे अपेक्षा असते. मात्र अलीकडे जिल्हा परिषदेच्या रिंगणातही नेत्यांची मुले हमखास पाहावयास मिळतात. आता ही मानसिकता ‘गोकुळ’मध्येही घुसली आहे. दोन्ही गटाकडून आपापले वारसदार, घरातील व्यक्ती रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही गटांना विजयाची समसमान संधी निर्माण झाल्याने, नेत्यांनी घरातील पत्ते बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वीस-पंचवीस वर्षे नेत्यांवर श्रध्दा ठेवून राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरात काय? असा सवाल विचारला जात आहे. तगड्या पॅनेलच्या नादात दोन्ही गटाकडून सामान्य कार्यकर्त्यांना मात्र कात्रज घाट दाखवला जाणार, हे निश्चित आहे.
...म्हणून मागील निवडणुकीत दिग्गजांना घाम
मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सामान्य कार्यकर्त्यांना पॅनेलमध्ये संधी दिली हाेती. एक-दोन चेहरे वगळता जिल्ह्याला ओळख नसणारे बहुतांशी उमेदवार असतानाही, सत्तारूढ गटातील दिग्गजांना विजयी होताना घाम फुटला होता. यावरून मतदारांची मानसिकता काय असते, हे ओळखून नेत्यांनी यावेळची पॅनेल बांधणी करणे अपेक्षित होते.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाचे ‘गोंडस’ कारण
कार्यकर्त्याला डावलून आपल्या घरातील व्यक्तीला पुढे कसे करायचे, असा प्रश्न असतो. यासाठी आपल्या अवतीभोवतीच्या तिघा-चौघांच्या माध्यमातून नाव पुढे करायचे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातरचे ‘गोंडस’ कारण पुढे केले जाते.
संभाव्य पॅनेलमध्ये २१ जणांचा समावेश
दोन्ही आघाड्यांकडून पॅनेल बांधणीस वेग आला आहे. सत्तारूढ गटाकडून दहा, तर विरोधी आघाडीकडून तेरा असे २३ जण थेट नेत्यांच्या घरातील उमेदवार असू शकतात. स्वत:सह मुलगा, भाऊ, पत्नी, आई, पुतण्यांचा भरणा आहे.