(बाजार समिती लाेगो)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मारुती ढेरे (वरणगे) यांनी जबाबदारी निश्चितीपोटी २ लाख १२ हजार रुपये भरल्यानंतर त्यांना अशासकीय मंडळात घेतले आहे. गेली दोन महिने त्यांची नियुक्ती रखडली होती.
मारुती ढेरे हे २०१० ते २०१५ या कालावधीत संचालक होते. या कालावधीत बाजार समितीच्या कारभाराची चौकशी होऊन संचालक व अधिकाऱ्यांवर २२ लाख ८७ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. मात्र, संचालकांनी हे पैसे न भरल्याने त्यांच्यावर महसुली कारवाई सुरू केली. गेली आठ वर्षे दोन संचालक वगळता कोणीही पैसे भरले नाहीत.
दरम्यानच्या काळात २०१५ ते २०२० पर्यंतचे संचालक मंडळाची मुदत संपल्याने त्यांनी राजीनामे दिले आणि पणन मंडळाने तिथे अशासकीय मंडळाची नियुक्ती केली. के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अशासकीय मंडळ कार्यरत होऊन दहा महिने झाले आहेत. नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांची सोय अशासकीय मंडळाच्या माध्यमातून केली. माजी संचालक मारुती ढेरे यांचे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळचे सबंध आहेत. त्यांनी पवार यांच्याकडून अशासकीय मंडळात घेण्यासाठी प्रयत्न केले आणि पणन मंडळाने त्यांच्या नियुक्तीबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे अभिप्राय मागितला. ढेरे यांच्यावर जबाबदारी निश्चित होऊन त्यांनी बाजार समितीचे पैसे भरले नसल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी कळवले. गेल्या दीड महिन्यात ढेरे यांनी २ लाख १२ हजार रुपये समितीमध्ये भरल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
कोट-
मारुती ढेरे यांनी जबाबदारी निश्चितीची २ लाख १२ हजार रुपये रक्कम समितीकडे भरल्यानंतर त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर