अनिल पाटीलमुरगूड : सकाळी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वडिलांचे आकस्मित निधन झाले. त्यातच मुलाचा बारावीचा पेपर. एकीकडे दुख:चा डोंगर तर दुसरीकडे भविष्याची चिंता. अभ्यास नियमित कर, मार्क्स चांगले पडले पाहिजेत असा कायमचा वडिलांचा तो होरा. अशा मनस्थितीत त्याने वडिलांचे निधन होवून देखील काळजावर दगड ठेवून आपला बारावीचा पेपर दिला. असा दुर्देवी प्रसंग मुरगूड येथील गणेश महादेव कांबळे या विद्यार्थ्यावर आला.वडील नगरपालिकेत सफाई कामगार. कॉलेज करत गणेश घरात मदत व्हावी यासाठी एका झेरॉक्स सेंटरमध्ये काम करत. सकाळी अचानक गणेश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. सारे घर दुःखात बुडाले. गणेशला शिक्षकांनी धीर देत पेपरसाठी नेले खरे. तब्बल तीन ते चार तास गणेशच्या परीक्षेसाठी वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे थांबवले. पेपर देऊन आलेला गणेश वडिलांच्या मृतदेहावर ध्याय मोकलून रडला आणि गणेशच्या वडिलांचा इहलोकीची प्रवास संपला.मुरगूड येथील पाटील कॉलनी मध्ये वास्तव्यास असणारा आणि शिवराज ज्युनियर कॉलेजमध्ये १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या गणेश महादेव कांबळे या परीक्षार्थ्याचे वडील महादेव गणपती कांबळे (वय वर्षे ६४ )यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. कोल्हापुरात उपचार चालू असताना महादेव कांबळे हे मयत झाल्याची माहिती घरात मिळताच अकस्मात झालेल्या निधनाने घर शोकसागरात बुडाले. वडील मयत झाल्याची बातमी समजताच गणेशवर आभाळ कोसळले.आज गणेशचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. मृतदेहाची सर्वजण प्रतीक्षा करत थांबले होते. परीक्षेची वेळ झाल्याने शाळेतच परीक्षा असल्यामुळे हा विद्यार्थी न आल्याची वर्ग शिक्षक उदय शेटे यांना माहिती समजताच त्यांनी चौकशी सुरू केली असता गणेशचे वडील मयत झाल्याची माहिती मिळाली. तातडीने घराशी संपर्क साधून माहिती घेतली असता गणेश पेपर देण्याच्या मनस्थितीत नव्हता.वर्गशिक्षक उदय शेटे तसेच अमर पवार, राजू कांबळे यांनी गणेशचे सांत्वन करत धीर दिला. यानंतर धीरगंभीर व जडअंतकरणाने गणेश परीक्षेसाठी गेला. मुलाचा पेपर होईपर्यंत तिकडे वडिलांचा मृतदेह तब्बल तीन तास थांबवला. पेपर देऊन येताच वडिलांच्या मृतदेहावर कोसळत गणेश धाय मोकलून रडू लागला. त्यामुळे सर्वांनाच हुंदका फुटला. अखेर नंतर महादेव कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बारावीचा पेपर देवून आल्यावर गणेशने केले बापावर अंत्यसंस्कार, धाय मोकलून रडला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 5:12 PM