तासगाव : गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) आज, सोमवारी छाननीत बाद होता-होता वाचले. त्यांचा राष्ट्रवादीकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा, असा आक्षेप माजीमंत्री व भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविल्यानंतर मतदारसंघासह राज्यात खळबळ उडाली. बेळगावात सीमाप्रश्नी केलेल्या भाषणावरून तेथील पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरुद्ध तक्रार नोंद असून, ती माहिती उमेदवारी अर्जात दिली नसल्याचा दावा घोरपडे यांनी केला होता. तथापि, निवडणूक आयोगाची कार्य पुस्तिका, भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यांचा अभ्यास करून पाटंील यांचा अर्ज वैध ठरविल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली. बेळगावात सीमाप्रश्नी मराठी भाषिकांच्या कार्यक्रमात पाटील यांनी भाषण केले होते. त्यानंतर त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती उमेदवारी अर्जातील रकान्यात नमूद करण्यात आली नसल्याची तक्रार अजितराव घोरपडे यांनी दिली. या प्रकरणात त्यांना शिक्षा होणार असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, असेही त्यात म्हटले होते.मात्र, या संदर्भातील प्रतिवाद प्रतिज्ञापत्र आर. आर. पाटील यांनी अर्जासोबत जोडले आहे. पाटील यांच्यावर गुन्हा नोंद नाही, तर केवळ एफआरआय नोंद आहे, असेही निकम यांनी स्पष्ट केले.या सर्व बाबींचा विचार करून आणि निवडणूक निरीक्षकांचा सल्ला घेऊन पाटील यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. गहमंत्री पाटील यांचे प्रतिज्ञापत्र खोटे असल्याची दुसरी तक्रार अपक्ष उमेदवार सूर्यकांत बापूसाहेब बोधले यांनीही दिली होती. तीही फेटाळण्यात आली.दरम्यान, उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याचे वृत्त मतदारसंघात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे समर्थक निवडणूक कार्यालयात आल्याने तणाव निर्माण झाला होता. राज्य राखीव दलाचे पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. अखेर दुपारी चार वाजता आर, आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)
छाननीत बाद होता-होता आबा वाचले!
By admin | Published: September 30, 2014 12:07 AM