कोल्हापूर : दुरावलेली दोन मने सात वर्षांनी पुन्हा एकत्र जोडून सुखी संसार जोडण्यामध्ये जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांना यश आले. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेचा शेवटचा दिवस दि. २४ मे सार्थकी लागला.क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधेसुधे स्थित्यंतर नाही. जगातली सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते; पण नवा विचार स्वीकारणे ही खूप मोठी घटना आहे.
अशीच एक घटना श्रुती आणि गजानन (नाव बदललं) यांचे लग्न साडेसात वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात करवीर तालुक्यातील गावात ११ जून २०११ रोजी झाले. पाहुण्यांची लगबग सतत घरात असायची. आग लावायचे काम ही त्रयस्थ नातेवाईक करायचे आणि सहा महिन्यांत सुखी संसाराचा विस्फोट झाला. श्रुती आणि गजानन यांची मने दुभंगली, श्रुती आईच्या घरी राहू लागली. दोघांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी दरी पडली.दरम्यान, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाच्या वतीने अनेक संसार जोडले, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये वाचून श्रुतीच्या आईच्या अशा पल्लवित झाल्या. त्या जिल्हा मध्यस्थी केंद्रात आल्या. त्यांनी सचिव मोरे यांची भेट घेऊन मुलीची करुण कहाणी सांगितली. मोरे यांनी धीर देत गजाननच्या नातेवाईकांना बोलवून घेतले.
दोघांच्या मनांतील गैरसमज दूर करीत, नातेवाईकांची समजूत घातली. श्रुती व गजानन यांनी चुकीचे दृष्टिकोन बदलत नवा विचार स्वीकारला. तब्बल सात वर्षांनी एकही पैसे खर्च न करता, सन्मानाने श्रुती गजाननसोबत नांदायला गेली. यावेळी दोघांच्याही आई ही आनंदीभेट डोळ्यांनी पाहत होत्या.
दुरावलेला संसार पुन्हा बहरल्याने त्यांचे डोळे भरून आले. श्रुती आनंदाने आपल्या सासरी गेली. यावेळी मध्यस्थी करणारे प्राधिकरणाचे सचिव मोरे यांनी दोघांना स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या. मोरे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बदली झाली आहे. त्यांच्या कोल्हापुरातील सेवेच्या शेवटच्या दिवशी हे आदर्श काम हातून घडले.