कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) १० सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता तपोवन मैदानावर ‘उत्तरदायित्व’ सभेचे आयाेजन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कारही होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी पत्रकातून दिली.ए.वाय. पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, प्रलंबित प्रश्न निकालात काढण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. भविष्यातही कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये त्यांचे योगदान राहणार आहे. तीन दिवसांपूर्वी आमचे दैवत शरद पवार यांची सभा कोल्हापुरात झाली. त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. परंतु; आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, औषध व प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत.
शरद पवारांच्या पाठोपाठ कोल्हापुरात अजित पवारांची ‘उत्तरदायित्व’सभा; जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी
By राजाराम लोंढे | Published: August 28, 2023 4:10 PM