प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मॉल किंवा बझारमधून वस्तू खरेदी केल्यानंतर ती ठेवण्यासाठी मोफत पिशवी देण्याऐजवी ग्राहकांकडून तिचे स्वतंत्रपणे पैसे आकारले जात आहेत. हा ग्राहकांना ताप होऊन बसला आहे. त्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतने गांभीर्याने दखल घेतली असून, अशा प्रकारे जबरदस्ती केल्यास ग्राहक न्यायालयात दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात दोन दिवसांत प्रबोधनपर विनंतीपत्रे मॉल्स व बझार व्यवस्थापनाला दिली जाणार आहेत.विक्रीपश्चात सेवा या सूत्रानुसार एखाद्या मॉल किंवा बझारमधून ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यास ती ठेवण्यासाठी पिशवी मोफत देणे हे क्रमप्राप्त आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातही तशी तरतूद आहे; परंतु याचे सर्रास उल्लंघन सर्वच मॉल्स व बझार यांमधून होताना दिसत आहे. वस्तू खरेदीनंतर त्या ठेवण्यासाठी पिशवीची खरेदी हे जणू ग्राहकांच्या अंगवळणी पडल्याचे दिसत आहे. मात्र याबाबत काही ग्राहकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे तक्रारी दिल्या आहेत. तसेच नुकताच चंदीगड जिल्हा ग्राहक न्यायालयाने ग्राहकांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामध्ये एका मॉलमधून ग्राहकाने ९०० रुपयांचा बूट खरेदी केल्यानंतर त्याच्याकडून कागदी पिशवीसाठी तीन रुपयांची जादा आकारणी केली. याबाबत ग्राहक न्यायालयाने ग्राहक संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी व अनुचित व्यापारी पद्धत अवलंबल्याबद्दल संबंधितांना नऊ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. याच आधारावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतनेही जिल्ह्यातील सर्व मॉल्स व बझार यांच्या व्यवस्थापनाला विनंतीपत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.ग्राहक संरक्षण कायद्यानुसार विक्रीपश्चात सेवा या सूत्रानुसार आपण ग्राहकांकडून खरेदीनंतर पिशवीचे पैसे स्वतंत्रपणे घेऊ नये, तसेच पिशव्यांची विक्री करायची असल्यास त्या तुमच्या मॉल किंवा बझारची जाहिरात करणाऱ्या नसाव्यात; तर त्या कोºया असाव्यात, असा मजकूर असलेली प्रबोधनपर विनंतीपत्रे दोन दिवसांत दिली जाणार आहेत. याबाबत नुकतीच ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची बैठक झाली.चंदीगढ येथील ग्राहक न्यायालयाच्या निकालाच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व मॉल्स व बझार व्यवस्थापनांना विनंतीपत्रे देण्यात येणार आहेत. तरीही जरी कुणी ग्राहकाकडून पिशवीचे पैसे घेतल्यास त्याविरोधात ग्राहक न्यायालयात दावा ठोकला जाणार आहे.- अरुण यादव, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर
मॉलमध्ये खरेदीनंतर पिशवी मोफतच द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:40 AM