लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : काँग्रेस पक्षातील कार्यपद्धतीवरून नाराज असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सहा महिन्यांनंतर येथील काँग्रेस भवनामध्ये उपस्थिती दर्शविली. सद्य:स्थितीमध्ये नागरिकांसमोरील अनेक समस्यांना वाचा फोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, जिल्ह्यासोबत राज्यातील कॉँग्रेसकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कॉँग्रेसच्या अशा दुर्लक्ष करण्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत मी पक्षापासून अलिप्त राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.शहर कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. मल्हारपंत बावचकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने येथील शहर कॉँग्रेस समितीमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यासाठी आवाडे कॉँग्रेस भवनमध्ये आले होते. त्यावेळी ते पुढे म्हणाले, बावचकर हे माझे राजकीय गुरू आणि पितृतुल्य असल्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आलो होतो. राज्यात आणि केंद्रामध्ये सध्या कॉँग्रेसची भूमिका विरोधकाची आहे. मात्र, ती प्रभावीपणे पार पाडली जात नसल्याने जनतेमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे. कॉँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची जी भूमिका, तीच माझी भूमिका असणार आहे. त्यामुळे आगामी वाटचालीबाबत कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधूनच निर्णय घेण्यात येईल, असेही आवाडे यांनी शेवटी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष प्रकाश मोरे होते. कार्यक्रमासाठी अशोकराव सौंदत्तीकर, नगरसेवक सुनील पाटील, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, अंजली बावणे, रत्नप्रभा भागवत, आनंदा साळुंखे, जेवरबानू दुंडगे, मंगल सुर्वे, शोभा कापसे, आदी उपस्थित होते.
सहा महिन्यांनंतर आवाडे कॉँग्रेस भवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:08 AM