कोल्हापूर : किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्याकडे महापालिकेने गांभीर्याने न पाहिल्याने मंगळवारी, तिसऱ्या व अंतिम दिवशी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत सूर्यकिरणे अंबाबाई देवीचा चरणस्पर्श करून पुढे लुप्त झाल्याने भाविकांना काही प्रमाणातच किरणोत्सव सोहळ्याचा लाभ मिळाला. गेले तीन दिवस सुरू असलेला हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. अंतिम दिवशी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा होती; पण एका जाहिरातीच्या फलकाच्या अडथळ्यामुळे ही सूर्यकिरणे देवीचा चरणस्पर्श करून किंचितशी वर सरकली. रविवार (दि. ३१ जानेवारी) पासून या किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीला चरणस्पर्श केला होता. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) ढगाळ वातावरणामुळे ही सूर्यकिरणे मंदिराच्या पश्चिम दरवाजातून आत येऊन फक्त गरुड मंडपापर्यंतच पोहोचली. त्यानंतर किरणोत्सव झाला नाही. मंगळवारी, तिसऱ्या दिवशी सूर्योदय सकाळी ७.०५ वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी ६.२९ वाजता होता. हवेत ३५ टक्के आर्द्रता असल्याने सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर व प्रा. किशोर हिरासकर यांनी व्यक्त केली होती; पण सूर्यकिरणांच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने सायंकाळी ६.०४ मिनिटांनी मंदिराच्या पितळी उंबरठ्यापर्यंत आलेली सूर्यकिरणे ६.१४ ते ६.१८ वाजेपर्यंत देवीच्या मूर्तीस चरणस्पर्श करीत किंचित वर सरकत लुप्त झाली. यावेळी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, के. आय. टी. कॉलेजचे प्राध्यापक, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, आदी उपस्थित होते. मंदिरात सूर्यकिरणांन प्रवेश केल्यानंतर ती पुढे सरकत असताना भाविकांतून ‘अंबा माता की जय’चा गजर उत्स्फूर्तपणे होत होता. सायंकाळी किरणांचा प्रवास ४सायंकाळी ५.१५ वा. - महाद्वार रोड ४५.३० वा. - गरुड मंडप ४५.३९ वा. - गणपती मंदिरामागे ४५.४८ वा. - कासव चौक ४६.०४ वा. - पितळी उंबरठा ४६.०९ वा. - पहिली पायरी ४६.१० वा. - दुसरी पायरी ४६.१४ वा. - तिसरी पायरी ४६.१५ ते ६.१८ वाजेपर्यंत चरणस्पर्श ते किंचितशी वर सरकली अडथळे दूर करण्यात अपयश या किरणोत्सव मार्गात महाद्वार रोडवरील रोमॅँटिक या कापड दुकानाच्या जाहिरातीच्या फलकाचा अडथळा येत असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. हा फलक लोकभावना म्हणून किरणोत्सवात तीन दिवस काढावा, याबाबत देवस्थान समितीने महापालिकेला कळविले होते; पण अखेरच्या दिवशीही तो काढलाच गेला नाही; अगर तो काढण्याबाबत महापालिकेने कोणतेही प्रयत्न केलेले नसल्याचे दिसून आले. किरणोत्सव सोहळ्याच्या अंतिम दिवसावेळी महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. हा फलक काढला असता तर किरणोत्सव आणखी किमान दीड मिनिट जादा वेळ होऊन सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली असती, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. किरणोत्सव सोहळ्यात फक्त चर्चाच; पुन्हा... वर्षातून दोनवेळा हा श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा होतो. त्यापूर्वी तज्ज्ञांद्वारे किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचा अभ्यास केला जातो. अडथळ्यांबाबत महानगरपालिकेला कळविले जाते; पण प्रत्यक्षात हे अडथळे दूर करण्याबाबत महापालिकेत उदासीनता दिसून येते. सोहळ्याचे तीन दिवस संपले की चर्चा संपते. ती पुन्हा पुढील किरणोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा सुरू होते, असे अलीकडे दिसून येत आहे.
चरणस्पर्शानंतर सूर्यकिरणे लुप्त
By admin | Published: February 03, 2016 12:48 AM