अतुल आंबीइचलकरंजी : शहरातील काही ठरावीक पानटपऱ्यांवर दिवसातील ठरावीक वेळेला तरुणांची मोठी गर्दी जमलेली असते. गुटखाबंदीनंतर माव्याकडे वळलेले तरुण आता पानासाठीही गर्दी करू लागले आहेत. पानातील नशेची सवय लागल्याने त्या-त्या वेळेला हे तरुण पानटपरीला गराडा घालून उभे असल्याचे चित्र आहे. ही बाब चिंताजनक असून, याकडे पोलिस व प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने देशभरातील विविध राज्यांतून नागरिक येथे येऊन स्थायिक झाले आहेत. उत्तर प्रदेश व बिहारकडील कामगार ठरावीक पद्धतीचे पान खातात. त्यासाठीच्या काही ठिकाणी मुख्य मार्गावर उघड्या पद्धतीच्या टपऱ्या आहेत. त्यांची संख्या मर्यादित आहे. परंतु, आजकाल नवीन पद्धतीची पानपट्टी दुकाने थाटलेली दिसतात. कोणत्याही भागात असलेल्या या टपऱ्यांवर तरुणाईची गर्दी जमते. दिवसभरात सहा ते आठवेळा असे विशिष्ट पान खाणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये नेमका कोणता घटक असतो? त्यातून ही सवय जडते, याचा तपास होणे आवश्यक आहे.पूर्वीपासून नागवेलचे पान घेऊन त्याला थोडा चुना, सुपारी आणि कात घालून खाण्याची पद्धत होती. त्यासोबतच पत्ती घालून पान खाणारे व्यसनी ठरू लागले. कालांतराने त्यात वाढ होत रिमझिम पान आले. आता त्यापुढील प्रकार बाजारात आल्याची चर्चा आहे. याचा शरीरावर कोणता विपरीत परिणाम होतो, याचा कोणतीच यंत्रणा तपास करीत नाही.नियमित गुटखा खाणाऱ्यांना तंबाखू आणि सुगंधी सुपारी अशा दोन स्वतंत्र पुड्या घेऊन त्या एकत्र करून खाल्ल्या जातात. त्याची राजरोसपणे सर्वत्र विक्री सुरू आहे, तर मावा विक्रीही जोरदार आहे. काही पानटपऱ्यांमध्ये तरुण नंबर लावून मावा खाण्यासाठी थांबलेले असतात. तेथे पानपट्टीचालक मावा तयार करण्यासाठी सर्व पदार्थ एकत्र करून प्लास्टिक पिशवीत घालून ते घासण्यासाठी संबंधित ग्राहकालाच देतो.
पोलिसांकडून एक दिवस होळीपोलिसांनी होळीच्या दिवशी शहरातील काही पानपट्टीचालकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याकडील मावा एकत्र करून त्यांनाच त्याची होळी करायला लावली. परंतु, अशी कारवाई नियमित होण्याची गरज आहे.
गुटख्यावरील कारवाई बंदचकाही महिन्यांपासून इचलकरंजीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात गुटख्यावरील कारवाई बंद झाल्याचे दिसते. यामागे नेमके कोणते कारण आहे, याचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे.