विश्वास पाटील
कोल्हापूर : त्यांच्या पतीचे १ एप्रिलला अपघाती निधन झाले. त्यांनी मंगळसूत्र तोडू दिले नाही..जोडवीही काढू दिली नाहीत की, सौभाग्याचे लेणं म्हटले जात असलेले कुुंकूही पुसू दिले नाही, ही बंडखोर कृती केली आहे येथील शुभांगी किशोर थोरात यांनी.
हेरवाड (ता.शिरोळ) ने विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा राज्यभर गाजावाजा झाला, परंतु त्याअगोदर थोरात यांनी स्वत:सह आई व सासूच्या कृतीतूनच या प्रथेला फाटा दिला आहे. हे धाडस करण्यासाठी त्यांना लंडनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला मुलगा अभिषेक, सून, सासूबाई पार्वती थोरात व आई शिक्षिका असलेल्या सुशीला पाटील यांचा मोठा मानसिक आधार मिळाला.
घडले ते असे : थोरात कुटुंबीय मूळचे कराड तालुक्यातील कालवडेचे. किशोर विश्वनाथ थोरात हे वायुदलात होते. वीस वर्षे त्यांनी देशसेवा केला. निवृत्तीनंतर कोल्हापुरात क्रशर चौकात सुखासमाधानाचे जीवन जगत होते. ३० मार्चला ते गावी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्या गाडीचा अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. ते स्वत: पुढारलेल्या विचारसरणीचे होते. नोकरीच्या निमित्ताने देशभर फिरलेले. त्यामुळे बुरसटलेल्या प्रथा परंपरांना त्यांचा विरोधच होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही या विचारधारेला धक्का लागू द्यायचा नाही, असा निर्णय शुभांगी थोरात यांनी घेतला.
त्यांनी पती निधनानंतर मंगळसूत्र तोडू दिले नाही. डोळ्यांत मणी घालण्याची पद्धत आहे म्हणून अगोदरच विकत मणी आणून ठेवला. जोडवी काढू दिली नाहीत. कुंकूही पुसू दिले नाही आणि बांगड्याही फोडू दिल्या नाहीत. पती निधनानंतरही त्यांनी हिरव्या साड्या नेसणे बंद केले नाही. सर्व विधी पाचव्या दिवशीच करून त्या १५ व्या दिवशी स्वत:च्या रेसक्रोर्स नाक्यावरील साडीच्या दुकानात यायला लागल्या. नात्यातील एका लग्नात त्यांना कुंकवाचा मान दिला नाही म्हटल्यावर तुम्ही असे करणार असाल तर मला लग्नाला बोलवू नका, असे त्यांनी बजावले व त्यात त्यांना यश आले.
चार वर्षापूर्वी आईलाही कुंकू पुसू दिले नाही
थोरात यांच्या आई सुशीला पाटील या कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथील रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. शेती अधिकारी असलेल्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्यावर त्यांनी आईलाही कुंकू पुसू दिले नाही. उलट आईकडूनच कुुंकू लावून ओटी भरुन घेतली. जेव्हा मुलीनेच त्यांना कुंकू लावलं तेव्हा मला आज आरशात बघावं, असं वाटलं अशी त्यांच्या आईची भावना होती. नवा आत्मविश्वास देणारी ही कृती होती.
बाईच बाईचे खच्चीकरण करते असा अनुभव मला आला म्हणून मी स्वत: मुलाच्या लग्नात विधवा असलेल्या सासूबाईंच्या हस्तेच मुहूर्तमेढ रोवली. वास्तुशांतीमध्ये घराचे तोरणही त्यांच्याच हस्ते बांधले. आपणच कुटुंबापासून विधवा महिलांना सन्मान देण्यास सुरुवात करायला हवी. - शुभांगी थोरात