कोल्हापूर : भारदस्त आवाजाचे मालक लोकप्रिय रेडिओ उद्घोषक अमिन सयानी बुधवारी काळाच्या पडद्याआड गेले, पण त्यांच्या आवाजात कोल्हापूर आकाशवाणीची स्टेशन आयडेन्टी "आप सुन रहे हैं आकाशवाणी का कोल्हापूर एफ एम" ही त्यांच्या खास शैलीतील धून कोल्हापूरच्या रसिक श्रोत्यांना रोज ऐकायला मिळते ते कोल्हापुरातील त्यांचे निस्सीम चाहते रियाज शेख आणि नीना मेस्त्री-नाईक यांच्यामुळे. आवाजाचे जादूगार अमीन सयानी यांचे बुधवारी निधन झाले. यानिमित्ताने कोल्हापुरातील आकाशवाणीच्या त्यांच्या आठवणींना त्यांच्या रसिक श्रोत्यांनी उजाळा दिला. अमीन सयानी हे लोकप्रिय रेडिओ उद्घोषक होते. कोल्हापूर आकाशवाणी साठी पूर्वी काम करणारे रियाज शेख आणि नीना मेस्त्री नाईक हे दोघेही त्यांचे निस्सीम चाहते.
कोल्हापूर आकाशवाणीची स्टेशन आयडेन्टी त्यांच्या खास शैलीत असावी असा आग्रह त्यांनी सयानी यांच्याकडे केली आणि त्यांनीही तत्परतेने "आप सुन रहे हैं आकाशवाणी का कोल्हापूर एफ एम" ही धून त्यांना पाठवली आणि आजही दहा सेकांदाची ही धून कोल्हापूर आकाशवाणी केंद्र रोज वाजवते. पाच वर्षांपूर्वी या घडामोडी घडल्या. रेडिओ सिलोनवर आजही त्यांच्या "बहनो और भाइयों" असे श्रोत्यांना संबोधित करण्याची त्यांची शैली लोकप्रिय आहे. कोल्हापुरातील रेडिओ उद्घोषक रियाज शेख आणि नीना मेस्त्री नाईक यांचा त्यांच्याशी स्नेह होता.
रियाज शेख आणि नीना मेस्त्री नाईक यांनी नोकरीच्या पलीकडे जाऊन कोल्हापूर आकाशवाणीसाठी ही धडपड केली होती आणि ती सत्यात उतरल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता. नीनाचा हिंदी पट्ट्यातील ऑल इंडिया रेडिओ आणि विविध भारतीच्या उद्घोषकांची चांगला संपर्क होता. -अरुण नाईक, कला प्रेमी, कोल्हापूर.