Kolhapur politics: राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळतोय, चंदगडमध्ये राजेश पाटील यांना पुन्हा घ्यावे लागणार कष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:21 PM2024-11-25T16:21:27+5:302024-11-25T16:22:54+5:30

निंगाप्पा बोकडे चंदगड : गेल्या पाच विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य असलेला चिरेबंदी वाडा यंदा अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील ...

After the defeat in the Assembly Rajesh Patil of the NCP Ajit Pawar group will have to struggle again in Chandgad | Kolhapur politics: राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळतोय, चंदगडमध्ये राजेश पाटील यांना पुन्हा घ्यावे लागणार कष्ट

Kolhapur politics: राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळतोय, चंदगडमध्ये राजेश पाटील यांना पुन्हा घ्यावे लागणार कष्ट

निंगाप्पा बोकडे

चंदगड : गेल्या पाच विधानसभा निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य असलेला चिरेबंदी वाडा यंदा अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे मोठ्या फरकाने निवडून आल्याने ढासळला आहे. त्यामुळे आमदार राजेश पाटील यांना त्या वाड्याची डागडुजी पुन्हा करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर माजी आमदार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०१३ साली त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या पत्नी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला. २०१४ मध्येही त्यांनी या मतदारसंघांमध्ये विजय मिळवत या मतदारसंघावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले. पुढे २०१९ मध्ये मात्र त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून माघार घेतली. त्याचवेळी मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला. 

मात्र, त्यांनीही काही कारणास्तव विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून संधी दिली. कार्यकर्त्यांनीही जिवाची बाजी लावून त्यांना आमदार केले; पण गेल्या काही वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार गट व शरद पवार गट, असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले. आमदार राजेश पाटील अजित पवार गटासोबत गेले. त्यानंतरही राजेश पाटील यांनीही हा राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा ढासळू नये, याची पुरेपूर काळजी घेतली.

मात्र, मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्याने कार्यकर्त्यांची फळी विभागली गेल्याने पक्षाची ताकद कमी झाली. दरम्यान, याच काळात सातत्याने मतदारसंघात ठाण मांडून राहिलेल्या भाजपाच्या शिवाजी पाटील यांनी महायुती सरकार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने भाजपच्या चंदगड मतदारसंघात चांगला जम बसविला. महायुतीच्या फार्म्युल्यानुसार चंदगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असतानाही बंडाचे निशाण फडकावत शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून बाजी मारली.

राष्ट्रवादी अभेद्य बनविणार 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही माझ्या पाठीशी खंबीर आहेत. त्यामुळे झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करून त्यांना पुन्हा ताकद देऊन राष्ट्रवादीचा हा वाडा अभेद्य बनविणार असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: After the defeat in the Assembly Rajesh Patil of the NCP Ajit Pawar group will have to struggle again in Chandgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.