कोल्हापूर : जाहीरात होर्डिंग कोसळून मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने शहरातील होर्डिंग व्यवसायीकांची बैठक घेतली. शहरात लावलेल्या होर्डिंगची स्टॅबिलीटी तपासून घ्यावी तसेच ‘वादळी वाऱ्याच्या वेळी होर्डिंगखाली कोणीही थांबू नये’ असे फलक होर्डिंगच्या खाली लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. वादळी वारे तसेच जोराच्या पावसाने शहरात होर्डिंग कोसळण्याची घटना घडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घ्यावी, अशी सूचना उपायुक्त साधना पाटील यांनी बैठकीत केली. यावेळी इस्टेट अधिकारी विलास साळोखे शहरातील होर्डिंग व्यावसायीक असोसिएशनचे अध्यक्ष अमित सांगावकर, संदीप खामीतकर, सुहास सांगवडेकर, किरण शिंदे, ज्ञानदेव पाटील, सर्जेराव पाटील, रणजीत चौगले उपस्थित होते.कोल्हापूर शहरात जवळपास ६९१ होर्डिंग लागले असून त्यासाठी व्यावासायीकांनी महापालिका प्रशासनाकडून रितसर परवाना घेतले आहेत. यातील ६६ होर्डिंग हे महापालिकेच्या जागेवर, ६२५ होर्डिंग खासगी मिळकतीवर आहेत. दहा एलईडी होर्डिंग आहेत. महापालिकेच्या पॅनेलवरील इंजिनिअरकडून प्रत्येक वर्षी या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट घेऊन ते महापालिका इस्टेट विभागाला देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोल्हापुरात चार होर्डिंग बेकादेशीर असून संबंधितांना तातडीने ते उतरवून घेण्याची नोटीस दिल्याचे इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी सांगितले.
घाटकोपर दुर्घटनेनंतर कोल्हापूर महानगरपालिका झाली अलर्ट, नागरिकांना दिल्या सूचना
By भारत चव्हाण | Published: May 14, 2024 5:34 PM