इचलकरंजी : विवाहानंतर महिन्याभरातच नवविवाहितेने चार तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड घेऊन पलायन केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार विनोद अशोक उत्तुरे (रा. लक्ष्मी माळ, कबनूर) यांनी दिली आहे.
सीमा जगदीश मोदानी (वय ४३), माधुरी शशिकांत चव्हाण (३४, दोघे रा. कबनूर, ता. हातकणंगले), शहिदा सरदार बारगीर, फारूख सरदार बारगीर (दोघे रा. रुई, ता. हातकणंगले) व रेखा नामदेव घाटगे (सध्या रा. जयसिंगपूर, मूळ रा. मायणी, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सीमा, माधुरी, शहिदा व फारूख बारगीर हे चौघेजण वधू-वर सुचकाचे काम करतात.
विनोद उत्तुरे हे लग्नासाठी मुली बघत असल्याची माहिती फारूख व रेखा यांना समजली. त्यांनी उत्तुरे यांना भेटून रेखा घाटगे हिचे स्थळ दाखवून लग्नाची बोलणी करत विवाह करून दिला. संशयित आरोपींनी लग्नाची फी म्हणून फिर्यादीकडून ५० हजार रुपये घेतले, तर लग्नात विनोद यांनी रेखा हिला अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र तसेच पूजेच्या दिवशी घरातील तीन तोळे सोन्याचे गंठण व अर्धा तोळे कानातील सोन्याचे झुबे दिले होते.
लग्न झाल्यानंतर महिन्याभरात रेखा ही विनोद यांच्यासोबत माहेरी जाते, असे सांगून जयसिंगपूर बसस्थानक येथून कोठे तरी निघून गेली. विनोद यांनी यासंदर्भात चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर रेखा घाटगे ही बेपत्ता असल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शोध घेऊन रेखा हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता रेखा हिने माझे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद यांनी पाचजणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहन पाटील करीत आहेत.