उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस सज्ज रहा, असे आवाहन महिला चळवळीच्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथे आजरा, भुदरगड तालुक्यातील देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी व शोषित महिला यांच्या निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर होते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. पानसरे यांच्या हस्ते झाले.पानसरे म्हणाल्या, आंदोलनाशिवाय सरकार जागे होत नाही. सरकारला सर्वसामान्य जनतेचे दु:ख, कष्ट दिसत नाही. या सरकारला मायबाप कसे म्हणणार. लहान-सहान गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकार हे बड्या उद्योगपतींसाठी काम करते की काय, अशी शंका आहे. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण करा. कष्टकरी जनतेच्या पैशावर हे सरकार आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेसोबतच राहू.यावेळी देवदासी निराधार मुक्ती केंद्राचे उपाध्यक्ष चंद्रकांत तेलवेकर, सचिव बापूसाहेब म्हेत्री, नामदेव कांबळे, सरपंच वैशाली आपटे, देशभूषण देशमाने, आजऱ्याच्या नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, प्रा. राजा शिरगुप्पे, अनंतराव आजगावकर यांची भाषणे झाली. आप्पासाहेब कांबळे यांनी आभार मानले. प्रा. सुभाष कोरी यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी उपसरपंच सचिन उत्तूरकर, उपसभापती शिरीष देसाई, सदानंद व्हनबट्टे, महेश करंबळी, सुधीर जाधव, दीपक कांबळे, आप्पा कांबळे, सूरज कांबळे, मंगल कांबळे, रमेश नाईक, नामदेव कांबळे, नगरसेवक उदय कदम, बाबूराव धबाले, सूरज पुजारी, रवी कामत, महेंद्र कामत आदींसह देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी, शोषित महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचा ठराव मेळाव्यात करण्यात येऊन धडक मोर्चास सहभागी होण्याचे ठरले.
तीन वर्षांनंतरही पानसरेंचे खुनी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:58 PM