कोल्हापूर : तुलसी विवाहानंतर आता सर्वत्र लग्नाचे बार उडणार असले तरी महागाई वाढल्याने पंगतीचा खर्च वाढणार आहे. गेल्या दोन वर्षात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने आता केटरर्सनीदेखील ताटाची किंमत वाढवली आहे. त्यामुळे आता लग्नाचा खर्च काढताना पंगतीसाठी जास्तीचे बजेट काढून ठेवावे लागणार आहे.
दिवाळी आणि तुलसी विवाह झाले की, लग्नाचे मुहूर्त सुरू होतात, विवाह साेहळ्यांचा हा धुमधडाका अगदी जुलै महिन्यापर्यंत सुरू असतो. गेली दीड वर्षे कोरोना, लॉकडाऊन, २५ माणसातच लग्न अशा नियमांत बांधून राहिल्यानंतर आता सगळ्यांचीच मानसिकता आपल्या कुटुंबातील लग्नसमारंभ जंगी करण्याची आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाला इव्हेंटचे स्वरुप आले आहे. पूर्वी पाच दिवस विवाह साेहळे चालायचे. आता तोच ट्रेंड पुन्हा आल्याने लग्न समारंभांवरील खर्चदेखील वाढला आहे. दोन वर्षात लॉकडाऊन असले तरी महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस सिलिंडर, अन्नधान्य, तेल, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने लग्नातील पंगतींचाही खर्च आता वाढणार आहे.
काय काय महागले
गॅस सिलिंडर : ६०० : ९९०
हरभरा डाळ : ७५ रुपये : ८० रुपये
पेट्रोल : ९० : ११०
भाजीपाला : ६० रुपये किलो : ८० रुपये किलो
ताटामागे ५० रुपयांचा फरक
समारंभाला येणारी माणसं आणि ताटांवर केटरिंगचा दर ठरतो. लॉकडाऊन आधी एका बेसीक ताटाला १६० ते १८० रुपये इतका दर होता. आता ही रक्कम वाढून अडीचशे रुपयांपर्यंत केली आहे. या ताटात पदार्थ वाढले, काही वेगळे पदार्थ घेतले, रिसेप्शनमध्ये पाणीपुरी, भेल, चाट, चायनीज पदार्थ असे वेगवेगळे स्टॉल लावले तर त्याचे दर पुन्हा ५० रुपयांनी वाढतात. अशा रितीने आता कमीत कमीत अडीचशे रुपयांपासून साडेचारशे रुपयांपर्यंत एका ताटाचा दर आहे.
कोणत्या महिन्यात किती मुहूर्त
नोव्हेंबर : २०, २१, २९, ३०
डिसेंबर : १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९.
जानेवारी : २०, २२, २३, २७, २९
फेब्रुवारी : ५, ६, ७, १०, १७, १९
मार्च : २५, २६, २७, २८.
एप्रिल : १५, १७, १९, २१, २४, २५
मे : ४, १०, १३, १४ , १८, २०, २१, २२, २५, २६, २७.
जून : १, ६, ८, ११, १३, १४, १६, १८, २२.
जुलै : ३, ५, ६, ७, ८, ९.
गेल्या दोन वर्षात पेट्रोल, डिझेल, तेल, भाजीपाला, धान्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे आम्हाला ताटाचा दरदेखील वाढवावा लागला आहे. आपल्या समारंभातील जेवण खास असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, पदार्थ वाढले की, त्याचा खर्चही वाढतो. नियमित ताटाचा दर पूर्वी १८० रुपये होता, आता २०० ते २५० रुपयांपर्यंत वाढवावा लागला आहे. - सादिक काळे, फुडताज केटरिंग सर्व्हिसेस