कोल्हापूर : शहरात लागू असलेली संचारबंदी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन यामुळे दुपारनंतर शहरातील वर्दळ कमी झाली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद होत्या. त्यामुळे शहरात दुपारपासून शांतता निर्माण झाली. रस्ते काहीसे ओस पडल्याचे दिसले.नेहमीप्रमाणे सकाळी भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक पिशव्या हातात घेऊन बाहेर पडले. तेव्हा अनेक ठिकाणी महापालिकेची पथके रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करत असल्याचे लक्षात येताच अनेकांनी अन्य पर्यायी रस्त्याने जाणेच पसंद केली.
भाजी मंडईतून गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने भाजी मंडईतील वर्दळ कमी दिसली. मंडईतसुध्दा भाजी विक्रेत्यांमार्फत सोशल डिस्टन्स राखून भाजी विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळाले.चारचाकीसह दुचाकी वाहनधारकांची वर्दळ मात्र सुरूच होती.
पोलीस, महापालिकेची पथके त्यांना अडवून येण्या-जाण्याची कारणे विचारत होती. विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत होती. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य काही दुकाने अर्धी शटर उघडून व्यवसाय करत होते.