विश्वास पाटील, कोल्हापूर: अफझलखान याच्या वधावेळी वापरली गेलेली वाघनखे ही साताऱ्याला छत्रपतींकडेच आहेत. हे मी १५ वर्षांपूर्वी लिहले होते. संपूर्ण अभ्यासाअंती ते मत मी मांडले होते. परंतू याबाबत वादविवाद सुरू असताना कोल्हापूरमधून एक बातमी आली, त्यामध्ये इंग्लडहून आणली जाणारी वाघनखे वधातीलच आहेत असे खोटे सांगण्यात आले. म्हणूनच याबाबत आता पुस्तिका प्रकाशित करून खोटं बोलणाऱ्यांना उघडे पाडणार असल्याचा इशारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी शुक्रवारी पुन्हा दिला.
समाजमाध्यावरील प्रतिक्रियेत सावंत म्हणतात, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम - लंडन येथील वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत याविषयीचा ठाम आणि ठोस पुरावा मिळाला आणि पुरावा म्हणून १९३१ ला वि. हा. कडोलीकर यांना व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पाठवलेल्या पत्रातील मजकूर वाचून दाखवण्यात आला. कडोलीकर यांच्या पत्रांचा संदर्भ घेऊन मीही माझ्या पुस्तकात ते छापलेले होते. (या पत्रामुळे माझाही काही काळ गोंधळ उडाला होता आणि मलाही ही इंग्लंड मधील वाघनख शिवरायांच्या वापरातील आहेत असे वाटले होते. तशा काही नोंदी ही माझ्या कडून झाल्या होत्या.) त्यामुळे हे पत्र देऊन ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत असा दावा करणाऱ्यांनी शिवाजी महाराजांची वाघनखे १९३१ नंतर सुद्धा साताऱ्यात होती. याचे छायाचित्र आणि प्रवास वर्णनातील पुरावे उपलब्ध आहेत याचा अभ्यास केलेला नाही.
म्युझियमकडे कोणताही पुरावा नाही
खरंतर ज्या लॉर्ड एल्फिस्टन आणि ग्रँट डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी ही वाघनखे भेट दिली त्यांनी सुद्धा ही वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही. उलट शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरलेले वाघनख सातारा छत्रपतींच्याकडे आहेत असेच या प्रत्यक्षदर्शीनी लिहून ठेवले आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये जिथे हे वाघनख आहे. त्यासमोरील फलकावर ‘ क्लेम’ असा शब्द लिहला आहे. हे क्लेम म्हणजे असे दावे अनेक वाघनखांच्याबाबत केले जातात असे सुद्धा लिहिले आहे. असा क्लेम करताना कोणते पुरावे आहेत का अशी विचारणा मी या म्युझियमला पत्राव्दारे केली होती. तेव्हा त्यांनी अशी कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट केले होते.