कोल्हापूर : महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणीसाठी आंदोलन पुकारले आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका मदतनीस दि. ८ आणि ९ जानेवारीच्या देशव्यापी कामगार संपात सहभागी होतील. त्यानंतर दि. ११ ते १३ फेबुवारीदरम्यान जेल भरो आंदोलन करणार आहेत.
सरकारने प्रश्नांची सोडवणूक करावी अन्यथा आगामी निवडणुकीत भाजप व मित्र पक्षास मतदान करणार नाहीत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सुवर्णा तळेकर यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अनुक्रमे १५०० रुपये आणि ७५० रुपये वाढ दिली आहे. ही वाढ निवडणूक तोंडावर असताना दिली आहे. गेल्या चार वर्षांत देशभरात अनेक राज्यात सेविकांनी अनेक संप केले. राज्य सरकारने संपावरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला.
मानधनवाढ देताना निवृत्तीचे वय ६५ वरून ६० पर्यंत कमी करण्याचा प्रयत्न केला. सेविका आणि मदतनीस यांची मुख्य मागणी वेतनश्रेणीची आहे. अशा प्रकारे सरकारने जाहीर केलेली वाढ सेविकांची अपेक्षा पूर्ण करणारी नाही. त्यामुळे पुन्हा संघर्ष केला जात आहे. जानेवारीतील संपात सेविका, मदतनीस यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तळेकर यांनी केले आहे.