-राजाराम कांबळे
-शाहूवाडीशाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच सामान्य जनता एका बाजूला व झाडून सारे नेते एका बाजूला असेच चित्र दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दोन्ही वेळा या मतदारसंघाने भरभरून साथ दिली. या मतदारसंघात संघटनेची फारशी बांधणी नाही; पण शेट्टी यांचा ऊस आणि दूध दरांसाठीचा संघर्ष हाच शाहूवाडीकरांचा झेंडा व तीच त्यांची जात आहे. त्यामुळे तीच लढ्याची पुण्याई घेऊन ते मैदानात आहेत.या मतदारसंघात शाहूवाडी पूर्ण तालुका व पन्हाळा तालुक्यातील ७४ गावे समाविष्ट आहेत. पन्हाळ्यापेक्षा शाहूवाडी तालुक्यातील मतदान सुमारे २० हजारांनी जास्त आहे. या मतदारसंघाचे आमदार सत्यजित पाटील हे शिवसेनेचे आहेत. त्यांचे विरोधी नेते विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आहेत. शेट्टी यांच्याविरोधात आता तरी संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेकडून धैर्यशील माने यांचे नाव चर्चेत आहे. कोरे यांचा या मतदारसंघात शिवसेनेशी झगडा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच कोरे धनुष्यबाणाने घायाळ झाले आहेत. त्यांना धैर्यशील माने यांचा प्रचार करण्यात अडचणी नाहीत; परंतु एप्रिलमध्ये ‘धनुष्यबाणाला विजयी करा’ म्हणायचे आणि विधानसभेला लगेच त्याच ‘धनुष्यबाणाचा पाडाव करा,’ असा प्रचार कसा करायचा असे धर्मसंकट त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ही जागा भाजपला देऊन तेथून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरविण्याच्या हालचाली कोरे यांच्याकडून सुरू आहेत. मात्र येथील उमेदवारी बदलण्याची शक्यता फारच धूसर वाटते.शाहूवाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना व कोरे गटाचे आहेत. पन्हाळा तालुक्यात कोरे गटाकडे सर्व महत्त्वाच्या सत्ता आहेत. त्यांची या तालुक्याच्या राजकारणावर चांगली मांड आहे. जिल्हा बँक व जिल्हा परिषदेत कोरे गटाचे शिलेदार सर्जेराव पाटील पेरीडकर हे सत्तेत आहेत. या मतदारसंघातील सत्तेचे एकही पद शेट्टी यांच्याकडे नाही. शाहूवाडी तालुक्यात तर त्यांच्या संघटनेचा झेंडा कुठे दिसत नाही; परंतु तरीही सामान्य शेतकरी त्यांच्या पाठीशी आहे. तोच त्यांची प्रचारयंत्रणा सांभाळतो. त्याला दुखवले तर विधानसभेला त्रास होईल म्हणून नेते लोकसभेला त्याच्यावर फारसा दबाव टाकत नाहीत; परंतु या वेळेला शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी भाजप व कोरेही जास्त आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाकडूनही आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळायला हवीत, असा दबाव येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीशी सूत जुळले तरी या दोन पक्षांचे नेते शेट्टी यांच्या प्रचारासाठी रान करतील, अशी चिन्हे नाहीत. या दोन्ही पक्षांची ताकदही मर्यादित आहे. कोरे व शेट्टी हा झगडा कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना असा आहे. त्यामुळे शेट्टींच्या पराभवासाठी कोरे जेवढ्या ताकदीने उतरतील, तेवढे शेट्टी यांचे मताधिक्य वाढते, या इतिहासाची यंदा पुनरावृत्ती होईल. शेट्टी यांनी मतदाराच्या लक्षात राहण्यासारखे काम केलेले नाही. बांबवडे येथे राईस मिलची घोषणा केली होती, तेसुद्धा काम पूर्ण नाही. चालू वर्षात उसाची बिले मिळालेली नाहीत. सदाभाऊ खोत यांनी सर्वच गटांच्या नेत्यांना विकासकामांचे वाटप केले आहे. त्यामुळे शेट्टी यांना मतांसाठी झगडावे लागणार हेसुद्धा तितकेच खरे आहे.