कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला होता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत दमदार पाऊस झाला. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दीड फुटांनी वाढली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. रविवारच्या तुलनेत पावसात वाढ झाली असून, सोमवारी मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. शहरातही अधून-मधून उघडीप देत दमदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. पावसाला कमालीचा गारठा असून सकाळपासूनच अंगाला थंडी बोचत होती. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ११.१८ मि.मी., तर सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४२.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण क्षेत्रात ३४, कासारी ७५, कडवी ७४, कुंभी ५५, पाटगाव ५५ तर कोदे लघु पाटबंधारे विभागात तब्बल ६५ मि.मी. पाऊस झाला. पाऊस सुरू झाल्याने धरणातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. पंचगंगा पातळीत रविवारच्या तुलनेत तब्बल दीड फुटांनी वाढ झाली असून सध्या १३.२० फुटांपर्यंत पाणी आहे. कसबा बावडा येथील राजाराम, रुई, इचलकरंजीबरोबर खडक कोगे या बंधाऱ्यावर पाणी आले असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. सोमवारी दिवसभरात एका घराची पडझड होऊन पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. ‘पुष्य’ नक्षत्रातील १३ दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. या नक्षत्रातील पाऊस शेतीसाठी उपयुक्त असतो, पण नक्षत्रातील बहुतांशी काळात दमदार पाऊस झाला नाही. आज, मंगळवारी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सूर्य ‘आश्लेषा’ नक्षत्रात प्रवेश करीत आहे. वाहन ‘हत्ती’ आहे. या काळात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज आहे. गगनबावडा परिसरात पाऊससाळवण : शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जरी कमी असला तरी, कोकण माथ्यावरच्या करूळ, गगनबावडा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळ्ी बरोबर कुं भी, सरस्वती व धामणी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. नेहमी तालुक्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा जोर कमी असून, रिपरिप पाऊस असणाऱ्या पावसात शेतकरी शेती कामात मग्न आहे. सततच्या रिपरिपीमुळे गेले दोन दिवस सूर्यानेही आपले दर्शन दिले नाही. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा जाणवतो.राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोरराधानगरी : राधानगरी परिसरात सोमवारी पावसाचा जोर वाढला. परिणामी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणातून जल विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे होणारा पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. सोमवारी दुपारी चार वाजता या धरणाची पाणीपातळी ३४४.७३ फूट झाली असून, ३४७.५० फूट पातळी झाल्यावर धरण पूर्ण भरते. सध्याचा पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन दिवसांत धरण भरण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत येथे ३४ मि. मी. व एकूण २२७० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरण क्षेत्रात पुन्हा दमदार वृष्टी
By admin | Published: August 02, 2016 12:24 AM