कोल्हापूर : खातेदाराच्या नावावर एकही गुंठा जमीन नसताना बनावट सर्च रिपोर्ट देणे व कागदपत्रांची तपासणी न करणे, स्पॉट व्हिजिट न करता बोगस पीक कर्ज व पाईपलाईन कर्जप्रकरण मंजूर करणाऱ्या वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह बँकेच्या पॅनेलवरील वकिलास करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
तत्कालीन शाखा व्यवस्थापक जयंत यशवंत गंदे (वय ४९, रा. रॉयल अपार्टमेंट, शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि सी. जी. कुलकर्णी (५९, न्यू महाद्वार रोड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या प्रकरणात यापूर्वी चारजणांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेत पीक व पाईपलाईन कर्ज मिळण्याकरिता राजाराम दादू पाटील याने २०१६ साली म्हालसवडे गावच्या तलाठ्याच्या सही-शिक्क्याचे आठ अ आणि सात-बाराचे खोटे उतारे देऊन बँकेकडून २३ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. हा प्रकार आॅक्टोबर २०१८ मध्ये उघडकीस आला होता.
या बोगस कर्ज प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, त्यामध्ये बॅँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी सहभागी असण्याची शक्यता गृहीत धरून करवीर पोलिसांनी तपास सुरू केला होता. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक गंदे यांनी कर्जदार यांच्याकडून आलेली कागदपत्रे पडताळणी न करता, तसेच स्पॉट व्हिजिट न देता कर्जप्रकरण मंजूर केले. या दोघांकडे तपास अधिकारी अरविंद कांबळे यांनी स्वतंत्ररीत्या चौकशी केली. चौकशीत दोघे दोषी आढळून आले. या फसवणुकीची रक्कम सुमारे आठ कोटी असून, ४५० कर्जदारांच्या नावांखाली ही रक्कम उचलण्यात आल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे शुक्रवारी करवीर पोलिसांनी दोघांनाही या प्रकरणी सहआरोपी करून अटक केलीे.
एकाच कुटुंबात २३ लाखांचे कर्जवाटपबॅँकेच्या नियमानुसार कर्जदाराच्या घरी जाऊन स्पॉट व्हिजिट देणे अपेक्षित असताना शाखा व्यवस्थापक गंदे यांनी ते न करता एकाच कुटुंबात २३ लाखांचे कर्ज दिले. मुख्य संशयित राजाराम पाटील याने पाच वर्षांसाठी ४ लाख ११ हजार, त्याची पत्नी राणीताई हिने ३ लाख ३४ हजार, मुलगा सचिन ३ लाख ७६ हजार ८००, सुमित ३ लाख २५ हजार ४००, सून सुमन ४ लाख ११ हजार, रेश्मा ३ लाख ७६ हजार ८०० रुपये असे बँकेकडून पीक व पाईपलाईन योजनेच्या नावाखाली सुमारे २३ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतल्याचे स्पष्ट झाले.संतोष पाटील ब्रेन...यापूर्वी पोलिसांनी फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजाराम पाटील याच्यासह त्याची पत्नी राणीताई पाटील, मुले सचिन आणि सुमित पाटील, सून सुमन सचिन पाटील, रेश्मा सुमित पाटील, तसेच तलाठ्याच्या सही-शिक्क्याचा बनावट सात-बारा आठ-अ पुरवठा करणाऱ्या व या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या संतोष पाटील याला अटक केली आहे.
‘लोकमत’चा संशय खरा ठरलापीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १३ आॅक्टोबर २०१८ ला दिले होते. या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु कर्जाची नोंद संबंधित शेतकºयांच्या सातबारा उताºयावर झालेलीच नाही. त्यामुळे या फसवणुकीतील रक्कम वसूल होण्याची शक्यताही धूसर आहे. व्यवस्थापक जयंत गंदे हेच या प्रकरणी जबाबदार असल्याचे त्या वृत्तात म्हटले होते. त्यांना अटक झाल्याने तो संशय खरा ठरला