कोल्हापूर : विद्युत संच मांडणीचा अनुकूल निरीक्षण अहवाल देण्यासाठी एजंटाकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कोल्हापूर शहरातील विद्युत निरीक्षण उपविभाग श्रेणी दोनच्या सहायक अभियंत्यासह एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.संशयित सहायक अभियंता महेश गंगाराम चव्हाण (वय ३०, रा. साने गुरुजी सोसायटी, विश्रामबाग, सांगली), एजंट अभिजित वसंतराव मोरे (४०, रा. शिनोळी, ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आज, शनिवारी गडहिंग्लज न्यायालयात हजर केले जाणार आहे. शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे भाऊराव अण्णाप्पा गडकरी यांचे शीतला एंटरप्रायझेस नावाचे मशिनरी शॉप आहे. येथील विद्युत संच मांडणीचे सन २०१८-१९ चे वार्षिक निरीक्षण विद्युत निरीक्षण उपविभागाच्या (कोल्हापूर शहर) वतीने करण्यात येणार असल्याची नोटीस गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी नोटिसीप्रमाणे विद्युत संच मांडणीच्या भारतीय वीज अधिनियम व विनियम यांच्या बाबींची सर्व मुद्देनिहाय माहितीची फाईल तयार करून ठेवली होती.दि. २५ आॅक्टोबरला एजंट मोरे हा गडकरी यांच्या कारखान्यामध्ये फाईल घेऊन जाण्यासाठी आला. त्याने कारखान्यातील व्यवस्थापिका अश्विनी कालकुंद्रीकर यांची भेट घेऊन वीज मंडळाचे महेश चव्हाण हे विद्युत संच मांडणीचे वार्षिक निरीक्षण करण्यासाठी येणार आहेत.त्यावेळी त्यांना तयार केलेली फाईल द्यायची आहे. वार्षिक निरीक्षण अहवालामध्ये आढळलेल्या चुका न दाखविण्यासाठी तसेच अनुकूल निरीक्षण अहवाल देण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.व्यवस्थापक कालकुंद्रीकर यांनी गडकरी यांच्याशी मोरेचा फोन जोडून दिला. यावेळी फोनवरही मोरे याने लाचेची मागणी केली. गडकरी यांनी २५ आॅक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.दरम्यान, शुक्रवारी गडकरी यांच्या कार्यालयात दोन हजाराची लाच घेताना एजंट अभिजित मोरेला रंगेहात पकडण्यात आले. यानंतर काही वेळातच महेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले. दोघांच्याही घरांची रात्री उशिरा झडती घेण्यात आली.
लाच घेताना अभियंत्यासह एजंटास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:03 AM