बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील मानवाडपैकी खापणेवाडी येथील गट क्रमांक ४३ मध्ये रोपवन लागवडकामी मोजणी करण्यासाठी गेलेल्या वनधिकाऱ्यांना महिलांनी आक्रमक पवित्रा घेत घेराव घातला. महिलांचा तीव्र विरोध लक्षात घेता वनाधिकाऱ्यांनी मोजणीचे काम थांबवले. काही काळ वातावरण तंग झाले होते.
मानवाड येथील गट क्रमांक ४३ मध्ये गेल्या दोन पिढ्यांपासून येथील गरीब कुटुंबांकडून नाचना, वरी व ऊस ही पिके घेतली जात आहेत. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ही जमीन एकमेव आधार आहे. गरीब कुटुंबांना कसण्यासाठी जमीन देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. परंतु वनखात्याच्या नावे सात-बारा पत्रकी जमीन नोंद असल्याने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न वनखात्याकडून सुरू आहे.
रोपवन लागवड करण्यासाठी वनखात्याने खड्डेही मारले आहेत. ग्रामस्थांनी रोपवन लागवड करण्यास विरोध दर्शविल्याने लागवड लांबणीवर पडली.
मानवाड परिमंडल वनाधिकारी अतुल मगदूम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गट ४३ मध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या पीक क्षेत्राची मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता, महिलांनी त्यांचा डाव उधळून लावला. वनाधिकारी जमिनीमध्ये जवळपास दोन तास थांबून होते. वनपाल अतुल मगदूम महिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. कोणत्याही परिस्थितीत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतल्याने वनाधिकारी व ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची वाढली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. एकही रोप आम्ही लावू देणार नाही. आम्हाला खड्ड्यात पुरा, नाही तर फाशी द्या. आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. हा गट नंबर सोडून इतर ठिकाणी रोपवन लागवड करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतल्याने वनाधिकाऱ्यांनी काम थांबवले .
चौकटः
ग्रामस्थांनी वनखात्याला सहकार्य करावे
गट क्र ४३ वर वनखात्याची मालकी आहे. रोपवन लागवडीसाठी खड्डेही मारले आहेत. लागवडीसंबंधित वारंवार लोकांशी बैठका सुरू आहेत. तरीही चुकीच्या पध्दतीने विरोध सुरू आहे. नियमानुसार रोपवनलागवड केली जाईल. लोकांनी वनखात्याला सहकार्य करावे .
अतुल मगदूम, वनपाल, मानवाड .