कोल्हापूर : गेल्यावर्षी महापूर आणि यंदा कोरोनामुळे वाद्य पथक व कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अन्य व्यवसायांप्रमाणे वाद्यपथकांनाही नियमावलीच्या अधीन राहून व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी सोमवारी बँड-बेंजो, सनई-चौघडा, तुतारी, ढोलताशा, हालगी वाजंत्री संघटनेने केली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाद्यांच्या गजरात आंदोलन करण्यात आले.यंदा ऐन हंगामात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि तेंव्हापासून गेली साडेपाच महिने वाद्यपथकांवर बंदी आहे. वाजंत्री व्यवसायावर पाच ते सहा हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या वर्षी महापुराने सर्वच कार्यक्रम अत्यंत साध्या पध्दतीने झाले.
त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर वाद्यपथकांना बसला. मात्र, लॉकडाऊनमुळे या पथकाच्या मालकांबरोबरच वादक कलाकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.सलग दोन वर्षे ऐन हंगामात घरी बसावे लागल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. वाद्यपथकांकडे मनोरंजनाचा भाग म्हणून न पाहता उपयुक्त व्यवसाय म्हणून पहावे आणि परवानगी द्यावी,यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार साळोखे, उपाध्यक्ष सुभाष माने, सुनील धुमाळ, अतिश कदम, राजू शिंदे यांच्यासह वाद्यपथकांचे मालक व कलाकार आंदोलनात सहभागी झाले.