इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी लालबावटा जनरल कामगार युनियनने शनिवार (दि.२) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, यंत्रमाग उद्योग आर्थिक मंदीमध्ये असल्याने मजुरीवाढ देणे अशक्य आहे, असे यंत्रमागधारक संघटनांचे म्हणणे आहे. अशा परस्परविरोधी भूमिकेतून येथील वस्त्रोद्योग पुन्हा आंदोलनाच्या फेऱ्यात सापडतो का, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. आंदोलनाची तीव्रता वाढल्यास त्याचा फटका येथील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर यापूर्वी बसल्यामुळे आताच्या आंदोलनाची धास्ती वाटू लागली आहे.साधारणत: सन १९९८-९९च्या दरम्यान जागतिक मंदीच्या निमित्ताने देशातील वस्त्रोद्योगातच जोरदार मंदीचे सावट पसरले. याचा सर्वांत मोठा फटका इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला बसला.
अनेक यंत्रमाग कारखाने बंद पडले आणि अक्षरश: भंगाराच्या भावाने यंत्रमाग विकले गेले. त्यानंतर सन २००२मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी टेक्निकल अप ग्रेडेशन फंड ही योजना जाहीर केली. त्यापाठोपाठ राज्य शासनानेही यंत्रमाग उद्योगाकरिता २३ कलमी पॅकेजची घोषणा केली. त्याचा परिणामम्हणून इचलकरंजीमधील यंत्रमाग उद्योगास पुन्हा ऊर्जितावस्था आली. तसेच शटललेस, रॅपियर आणि एअरजेट असे आॅटोलूम कारखाने येथे सुरू झाले आणि पुन्हा या वस्त्रनगरीचा विकास झाला. सन २०१२ पर्यंत येथील यंत्रमाग कामगारांना ५२ पिकाच्या कापडास ६४ पैसे मजुरी दिली जात होती. सन २०१३ मधील जानेवारी महिन्यात मजुरीवाढ मिळण्यासाठी सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने काम बंद आंदोलन केले. सुमारे ४२ दिवसांच्या आंदोलनानंतर तब्बल २३ पैसे इतकी विक्रमी मजुरीवाढ कामगारांना मिळाली आणि ८७ पैसे मजुरी कामगार घेऊ लागले.
त्यानंतर सन २०१४ मध्ये चार पैसे मजुरीवाढ मिळाली आणि कामगारांना ९१ पैसे मजुरी मिळू लागली. याप्रमाणेच सन २०१५ मध्ये सात पैसे व सन २०१६ मध्ये सहा पैसे मजुरीवाढ मिळाली. २०१७ मध्ये तीन पैसे मजुरीवाढ घोषित झाली; पण मंदीमुळे मजुरीवाढ मिळाली नाही. त्यानंतर सन २०१८ मध्ये सहा पैसे मजुरीवाढ मिळून ती आता १ रुपये १० पैसे इतकी आहे. सध्या मात्र यंत्रमाग उद्योग कमालीच्या आर्थिक मंदीमध्ये अडकला असल्याने मजुरीवाढ देऊ नये, अशी भूमिका डिसेंबर महिन्यापासूनच यंत्रमागधारक संघटनांनी घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर २०१८ रोजी सहायक कामगार आयुक्तांकडून सहा पैसे मजुरीवाढ देण्याची घोषणा करण्यात आली.
मात्र, या मजुरीवाढीची अंमलबजावणी होत नसल्याने एक महिना वाट बघून आता लालबावटा जनरल कामगार युनियनने २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन जाहीर केले आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कापडाला थोडा उठाव येताच ट्रकमध्ये सूत व कापडाची चढ-उतार करणाºया माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले होते. त्याचाही फटका ऐन सणासुदीच्या काळात येथील यंत्रमाग उद्योगाला बसला. त्यापाठोपाठच दिवाळीनंतरही माथाडी कामगारांनीच काम बंद आंदोलनकेले आणि त्यावेळीही नुकसान कापड उत्पादक यंत्रमागधारकांना सोसावे लागले. आता घोषित झालेल्या आंदोलनामुळे येथील कापड उत्पादक यंत्रमागधारक-व्यापारी आणि व्यावसायिक धास्तावले आहेत.महागाई निर्देशांकाशी निगडित मजुरीवाढसन २०१३ मध्ये कामगारांना मजुरीवाढ करण्यासाठी ४२ दिवसांचा संप झाला. त्यामुळे तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथून पुढे कामगारांना संघर्ष करावा लागू नये यासाठी महागाई निर्देशांकाशी निगडित मजुरीवाढ केली जावी, असे निर्देश दिले. त्याप्रमाणे दरवर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सहायक कामगार आयुक्तांकडून मजुरीवाढ घोषित केली जाते आणि ही मजुरीवाढ वर्षभर लागू होते, अशी प्रथा आहे.