कोल्हापूर : कनाननगर झोपडपट्टी सार्वजनिक रहिवास विभागात समाविष्ट करण्याबाबत महानगरपालिका सभेत मंजुरी मिळाली असून, हा मंजूर ऑफिस प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवून द्यावा, अन्यथा आम्हाला दि. १९ एप्रिलला तीव्र आंदोलन करून महापालिकेला घेराव घालावा लागेल, असा इशारा माजी नगरसेवक दिलीप पोवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कनाननगर झोपडट्टीतील नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना भेटून तसे निवेदनही दिले. या निवेदनात म्हटले आहे की, १९६६ मध्ये महानगरपालिकेने सक्षम अधिकारी नेमून ही झोपडपट्टी शासनाच्या नियमाप्रमाणे घोषित केली. त्यामुळे या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना लाईट, पाणी, ड्रेनेज, रस्ते, गटारी, शौचालये अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. झोपडपट्टीची संपूर्ण जागा कोईमार ट्रस्टच्या नावावर मालकी हक्क असून प्रॉपर्टी कार्डवर तशी नोंद आहे. त्याचे मुख्य प्रेम मसिहा (ट्रस्टी) असून त्यांनी आम्हास राहण्यास तोंडी परवानगी दिली आहे.
सन २०१८ मध्ये स्थानिक नगरसेवक दिलीप पोवार यांनी नगररचना विभागाला यादी देऊन, ही झोपडपट्टी रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावी, अशी पत्राने मागणी केली. त्याप्रमाणे नगररचना विभागाने मुंबई अधिनियम १९६६ कलम ३७ प्रमाणे रहिवासपत्राने मागणी केली. त्याप्रमाणे नगररचना विभागाने मुंबई अधिनियम १९६६ कलम ३७ प्रमाणे रहिवास कागदपत्रासह कायदेशीर ऑफिस प्रस्ताव तयार करून तो महासभेकडे मंजुरीस पाठविला. महासभेने त्यास एकमुखी मंजुरी दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर चर्च कौन्सिलर, कोल्हापूर जिल्हा चर्च, यंग मॅन ख्रिस्ती असोसिएशन या तिन्ही संस्थांनी, ही जागा आमच्या मालकीची असून ती रहिवास विभागात समाविष्ट करू नये, अशी हरकत घेतली आहे. या हरकतीस दिलेली मुदत संपून गेली आहे. तरीही मुदतवाढ मागत आहेत, हे योग्य नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
फोटो क्रमांक - ०१०४२०२१-कोल-कनाननगर
ओळ -
कोल्हापूर शहरातील कनाननगर झोपडपट्टीचा समावेश रहिवास विभागात करावा, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांना नागरिकांतर्फे देण्यात आले.