गणेशवाडी : यंदाच्या उसाला एकरकमी ३७०० एफआरपी द्या या मागणीसाठी आंदोलन अकुंश संघटनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून ऊस वाहतूक रोखली जात आहे. बुधवारी रात्री नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या वाहनाच्या टायर फोडण्यात आल्या. जोपर्यंत कारखानदार दर देणार नाही, तोपर्यंत ऊस वाहतूक रोखली जाणार असल्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिला.चालू वर्षी एफआरपी ३७०० रुपये मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी अकुंश संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हंगामाची सुरुवात करण्यात आली आहे. ऊस तोडणी सुरू झाली आहे. मात्र, दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा अंकुश संघटनेने दिला होता. त्यानंतर बुधवारी रात्री नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर ऊस वाहतूक करणारे वाहन अडविण्यात आले. यामध्ये चार ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या वाहनांच्या टायर फोडण्यात आल्या. यामध्ये वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले. रात्री झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, साखर कारखानदारांनी ३७०० रुपये एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नये, असा इशारा अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे. दरम्यान, यंदाही ऊस दरावरून शेतकरी संघटना, अंकुश संघटना आणि कारखानदार संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Kolhapur: ऊसदरासाठी अकुंश संघटनेचे आंदोलन, शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या फोडल्या टायर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:56 PM