चंदगड/प्रतिनिधी : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रविकिरण पेपर मिलमधील काही कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे कंपनीसह या औद्योगिक वसाहतीमधील सुरू असलेल्या उद्योगांना हानी पोहचेल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यास प्रतिबंध करून उपाययोजना करावी, असे निवेदन कंपनीत कार्यरत असणऱ्या कामगारांनी आमदार राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे.
रविकिरण पेपर मिल्समधील कर्मचारी असून, कर्मचाऱ्यांना दर महिना पगार न चुकता वेळच्या वेळी बँक खात्यामध्ये जमा होतो. तसेच कर्मचाऱ्यांना कंपनीकडून प्रॉव्हिडन्ट फंड, ईएसआय आणि पगारी रजा (नियमानुसार) मिळतात आणि कंपनीमधील वातावरण हे गुण्या-गोविंदाचे असल्याने येथे कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला जात नाही. कंपनीमध्ये जो काही संप केला जात आहे त्यात आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, आम्हाला वेळच्या वेळी सर्व सुविधा देतात. त्यामुळे आमच्या भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. कामगारांनी संप करत असताना काही मागण्या उपस्थित केल्या, यामध्ये प्रामुख्याने त्यांना महागाई भत्ता कंपनीकडून दिला जात नाही. या एका मागणीसाठी वाद सुरू आहे व विविध सामाजिक, राजकीय प्रतिनिधी त्यामध्ये सहभाग घेऊन कंपनीच्या नावे मुख्य मागणीच्या अनुषंगाने संपास सुरुवात झाली आहे. कंपनीविरोधात अपप्रचार चालू असल्याचे व या अनुषंगाने एमआयडीसीमधील उद्योगास हानी पोहचेल, असे वातावरण आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो ओळी:--1) हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आमदार राजेश पाटील यांना निवेदन देताना कामगार.
2) हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल्समध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत तहसीलदार विनोद रणवरे यांना निवेदन देताना कामगार.