कोल्हापूर : शाहूवाडी वनविभागातील अनागोंदी कारभार करणाऱ्यांवर कारवाईचे तोंडी आश्वासन दिल्यामुळे सकाळपासून उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्या वर्तवणुकीचा निषेध करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने ताराबाई पार्कातील वन विभागाच्या कार्यालयात संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.शाहूवाडी तालुक्यातील वन विभागाकडून होत असलेल्या गैरकारभाराचे प्रत्यक्ष भेटून पुरावे देऊनही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासो दबडे व जिल्हा संघटक अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी वनविभागाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. दिवसभर कोणीही अधिकारी फिरकले नाहीत.साडेचारच्या सुमारास शिष्टमंडळ मुख्य वनसंरक्षकांना भेटण्यास कार्यालयात गेले. त्यांनी शाहूवाडीतील वनविभागाकडून होत असलेल्या गैरकारभाराचे पाढेच वाचले. वन अधिकारी नंदकुमार नलवडे हे कारणीभूत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली.
यावर बेन यांनी तपास सुरू केला आहे, असे त्रोटक उत्तर दिले. यावर आंदोलकांनी लेखी मागितले, पण ते देण्यास नकार दिल्याने कार्यालयातच बेन यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आप्पासाहेब कांबळे, अनिल मिसाळ, राजू कांबळे, धनाजी पवार, सुरेश खोत यांनीही सहभाग घेतला.