कोल्हापूर : शेतीविषयक कर्जाबाबत स्टेट बँक आणि नाबार्ड यांच्यामध्ये पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. आत्मनिर्भर भारत, शाश्वत कृषी उत्पादन, शेतीपूरक उद्योग आणि कृषी माल प्रक्रिया उद्योगांसाठीच्या अर्थपुरवठ्यामध्ये हा करार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
स्टेट बॅंकेचे महाप्रबंधक दीपक कुमार लल्ला आणि नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक लवकुलीश रावळ यांनी या करारावर सह्या केल्या. स्टेट बॅंकेचे महाराष्ट्र सर्कलचे महाप्रबंधक संंजय श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. या करारानुसार ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, पशू विकास निधी, सूक्ष्म व लघु शेतीमाल प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यामध्ये निर्णायक भूमिका घेणारा ठरणार असल्याचे स्टेट बॅंकेचे एफआयएमएम कोल्हापूरचे विभागीय व्यवस्थापक विनोद कुमार यांनी सांगितले.
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर झालेल्या या करारावेळी स्टेट बॅंकेचे महाराष्ट्र सर्कलचे उपमहाप्रंबधक संतोष महापात्रा, महाराष्ट्र स्टेट वेअर हौसिंग कार्पोरेशनचे अध्यक्ष दीपक टावरे यांच्यासह अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी स्टेट बॅंक शेती विकासासाठी करत असलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक लवकुलीश रावळ यांनी केला.
नाबार्डने सुरू केलेल्या श्री शक्ती पोर्टलवरून बचत गटांचे वर्गीकरण करून त्याची माहिती स्टेट बॅंकेला पुरवली जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे स्टेट बॅंक बचत गटांना सुलभ व सोयीस्कररीत्या कर्ज उपलब्ध करून देणार आहे, असे स्टेट बॅंकेचे मुख्य महाप्रंबधक दीपक कुमार यांनी सांगितले.