रुकडी : हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी गावातील बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. तसेच गावात आता ऊस उत्पादकांची लूट थांबविण्यासाठी कृषी समितीची स्थापना करून चाप बसविण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या आवाडे गटाने अश्विनी पाटील यांची सरपंचपदी, तर राजू मगदूम यांची उपसरपंचपदी निवड केली. उपसरपंच मगदूम यांनी गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन विकासाभिमुख राजकारणाला व कामाला सुरुवात केली.यामध्ये गावात झालेले अतिक्रमण काढून टाकले, तर गावठी दारू विक्री बंद पाडून कामाला सुरुवात केली. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड मजूर, ऊस वाहतूकदारांकडून लुबाडणूक केली जात असे. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर मजुरांकडून शेतकऱ्याला जनावरांसाठी वाडे न देता चहापाणी, जेवण यासाठी पैसे मागणे, वाहतुकीसाठी पैसे उकळणे, वाहनधारकांकडून उसाचे वाहन ओढण्यासाठी ऊसमालकाला ट्रॅक्टर आणण्यास सांगणे अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देत. या तक्रारीकडे कारखान्याची यंत्रणादेखील दुर्लक्ष करीत आहे. ऊसतोडीबाबत कारखान्याने नियम केले आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसे. या बाबीचा गांभीर्याने विचार करून राजू मगदूम यांनी ग्रामसभेत कृषी समितीची स्थापना केली व त्यासाठी कारखान्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यानुसार कृषी समितीने ऊसतोडी करणाऱ्या मजुरांनी ३०० फुटांपर्यंत विनामोबदला ऊस वाहतूक करून वाहन भरणे, वाहनधारकाला खुशीने १०० रुपये एंट्री देणे, वाहन अडकल्यास ते काढण्याची जबाबदारी वाहनमालकाची, शेतकऱ्याला वाडे देणे, मजुरांनी वाड्याची विक्री गावातच १० रुपये ते ४० रुपयांना करणे, अशी नियमावली केली आहे.या कृषी समितीच्या अध्यक्षपदी राणोजी जोग, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार शिंगे यांची निवड केली आहे. (वार्ताहर)
कृषी समिती थांबविणार ऊस उत्पादकांची लूट
By admin | Published: November 17, 2015 12:30 AM