लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन सुरू झाले असून, यामध्ये शेती सेवा केंद्रेही बंद राहणार आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरही दुकाने बंद राहिल्याने पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यंदा मान्सून वेळेत हजेरी लावणार असल्याने ‘रोहिणी’ नक्षत्रात धूळवाफ पेरण्यांना वेग येणार आहे; मात्र बियाण्यांअभावी पेरा साधणार कसा, हेही महत्त्वाचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहेत. त्यामुळे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून दूध, मेडिकल वगळता इतर व्यवहार बंद राहणार आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये शेती सेवा केंद्रे किंवा शेतीशी निगडित इतर व्यवहार सुरू ठेवले होते. मात्र, या लॉकडाऊनमध्ये शेती सेवा केंद्रे सुरू करण्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही.
अक्षय्य तृतीयापासून कोल्हापुरात खरीप पेरणीची सुरुवात होते. साधारणत: जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत भाताच्या धूळवाफ पेरणीची लगबग सुरू असते. त्यात यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितल्याने शेतकऱ्यांची धांदल वाढली आहे. उन्हाळी पिके काढून ती जमीन खरिपासाठी तयार करण्यामध्ये शेतकरी गुंतला आहे. ‘रोहिणी’ नक्षत्रातील पेरा साधला जातो, त्यामुळे या नक्षत्रात पेरणी करायची यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बियाणे लागतात; मात्र शेती सेवा केंद्रे बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची कोंडी हाेणार आहे. मागील लॉकडाऊनप्रमाणे शेती सेवा केंद्रे सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.