संदीप बावचे ल्ल शिरोळ‘पाऊस कमी; पण महापुराची हमी’ असलेल्या शिरोळ तालुक्यात पाणी उपसाबंदीमुळे बळिराजावर नवे संकट उभे राहिले आहे़ कृष्णा, वारणा नद्यांमुळे तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् असलेल्या शेतीला आता दुष्काळाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे़ येत्या २४ तारखेपासून पाणी उपशावर बंदीचे आदेश आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ सध्या कोयना व चांदोली धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाकडून बारा-बारा दिवसांच्या तीन टप्प्यांत शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी उपशावर बंदी आली आहे़ त्यामुळे कृष्णा, वारणा काठावर असणाऱ्या गावांतील शेतीला त्याचा मोठा फटका बसणार आहे़ सध्या शेतकरी आहे ती पिके जगविण्याच्या प्रयत्नात असतानाच पाणी उपसाबंदीच्या आदेशाने तो अडचणीत सापडणार आहे़ धरणक्षेत्रातील साठा लक्षात घेऊन वारणा नदीच्या चांदोली धरण ते हरिपूर संगमापर्यंतच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील भागात २४ ते २८ एप्रिल, ११ ते १५ मे, २८ मे ते १ जून या तीन टप्प्यांत पाच दिवसांप्रमाणे उपसाबंदी लावण्यात आली आहे़ तर उपसा कालावधी १२ ते २३ एप्रिल, २९ एप्रिल ते १० मे, १६ ते २७ मे अशा तीन टप्प्यांत १२ दिवस पाणी उपसा कालावधी दिला आहे़ त्यामुळे कृष्णा, वारणेच्या काठावरील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे़ सध्या नदीकाठावरील गावांत भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र, या पाणी उपसाबंदीमुळे भाजीपाल्याच्या पिकात घट येणार आहे़ अशा परिस्थितीत इचलकरंजीच्या अमृत योजनेला दानोळी परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे़ मात्र, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता ही योजना अन्य ठिकाणी नेण्याची गरज निर्माण झाली आहे़ भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अमृत योजना गैरसोयीची बनणार आहे़ कोयना, चांदोली धरणांतील पाण्याचा अंदाज घेऊन हा उपसा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे़ मात्र, पिण्याच्या पाण्याला कोणतीही बंदी लावण्यात आलेली नाही़ कृ ष्णेचे पात्र कोरडेराजापूर बंधाऱ्याच्या पलीकडील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील सीमाभागासह काही गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तर शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतातील उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत़ दरम्यान, राजापूर बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुक्याला पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ तर म्हैसाळ योजना व लातूरचीही तहान राजापूर बंधाऱ्यामुळे भागत आहे़ टँकरची सोय कराशिरोळ तालुक्यातील चिपरी, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, कोंडिग्रे, आदी गावांत वाढलेल्या उन्हामुळे कूपनलिका व विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, टँकरची सोय करण्याची मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे़
शिरोळमध्ये शेतीच्या पाण्याला ग्रहण
By admin | Published: April 21, 2016 12:32 AM