कोल्हापूर : परतीच्या पावसाचा रोजच सुरू असलेला धिंगाणा पिकांसाठी काळ बनून आला असून, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाल्यातच जमा आहे. महापुराच्या तडाख्यातून जी काही पिके वाचली, ती परतीच्या पावसाने आपल्या कवेत घेतली. नेहमी पोषक बनून येणारा हा पाऊस यावर्षी मात्र काळ बनून आला आहे. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. नवीन पेरा करायचा तर शिवारे पाण्याने तुंबली असल्याने या वर्षीचा रब्बी हंगाम किमान एक महिन्याने पुढे जाणार आहे. मुख्य पीक असलेल्या भातकाढणी आणि ऊसलागणीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे धान्यासह वैरणीचा प्रश्नही पुढील काळात गंभीर बनणार आहे.
साधारणपणे आॅक्टोबरमध्ये पडणारा परतीचा पाऊस पुढील रब्बी हंगामासाठी पूर्वमशागत आणि पेरणीसाठी उपयुक्त ठरत असतो. या महिन्यातील पावसामुळे वर्षभराची पाण्याची टंचाईही कमी होते; पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा पाऊसच काळ बनून आल्याची परिस्थिती आहे. संपूर्ण जून महिना ओढ देणारा पाऊस पुढे मात्र आॅक्टोबरपर्यंत लांबत चालला आहे. यामुळे शेतीचे वेळापत्रक बिघडून गेले आहे. पिकांची पेरणी आणि वाढ सुरू असताना पाऊस ओढ देतो; पण नेमका काढणी सुरू झाल्यावर मात्र तो ढग फुटल्यासारखा बरसत आहे.
यावर्षीदेखील १ आॅक्टोबरपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. भात, सोयाबीन, भुईमुगाची काढणी सुरू असतानाच पावसाने थैमान घालत होत्याचे नव्हते करून सोडले आहे. महापुरामुळे आधीच नदीकाठासह सखल भागातील ऊस पूर्णपणे संपल्यात जमा आहे. जो काही तग धरून उभा होता, त्यातही आता गुडघ्याभरापेक्षाही जास्त पाणी साचले असल्याने ही शेती पूर्ण संपली आहे. महापूर ओसरल्यानंतर आडसाली आणि पूर्वहंगामी लागण हंगाम साधण्यासाठी घाईगडबडीने कांड्यासह रोपांची लागण केली; पण या रोपांमध्ये पाणी साचून ती कुजू लागली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनी सपाट झाल्या असून त्याच्या मशागतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रब्बीची पिके म्हणून हरभरा, शाळू आणि गव्हाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. माडे आणि आंतरपीक अशा दोन्ही पद्धतींनी ही पिके घेतली जातात; पण पावसामुळे अजून भातकापण्याच खोळंबल्या आहेत. शिवारे तयार करायची म्हटली तरी नांगर घालणे अशक्य आहे. रिकाम्या ठेवलेल्या जमिनीही तणाने भरून गेल्या आहेत. त्याच्या मशागतीसाठी शेतात जाण्याचीही परिस्थिती राहिलेली नाही. ज्यांनी गडबडीने पेरणी केली आहे, त्यांचा हरभरा पीक पावसामुळे कुजू लागले आहे.
- गेल्या २२ दिवसांत दोन हजार मिलिमीटर पाऊस
आॅक्टोबरमधील या २२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दोन हजार मिलिमीटर पाऊस झाला आहे. एका महिन्यात एवढा पाऊस पडण्याचा नवा विक्रम परतीच्या पावसाने केला आहे. आजअखेर ३४ हजार २१९ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.
- गळीत हंगामही लांबणीवर पडणार
मुळातच यावर्षी महापुरामुळे ऊस पीक ७० टक्क्यांपेक्षा अधिक उद्ध्वस्त झाल्याने कारखान्यांना गळितासाठी दर्जेदार ऊस मिळणे दुरापास्त होणार आहे. आता निवडणुका संपल्यानंतर गळीत हंगामाची तयारी सुरू करायची म्हटली तरी किमान एक महिना शेतात घात येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कारखान्यांचे धुराडे पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
- ऊसरोपांना मागणीच नाही
रोपांद्वारे ऊसलागण करण्याला अलीकडे प्राधान्य दिले जात असल्याने रोपवाटिकांचा व्यवसाय तेजीत होता; पण पावसामुळे लागणीच थांबल्या असल्याने रोपांची मागणीही ठप्प झाली आहे. यात केलेली गुंतवणूकही अडचणीत आली आहे.
- शेतकरी, शेतमजुरांना आर्थिक चणचण
अतिवृष्टी आणि महापुरामुळे खरिपातील पिके हातची गेली. त्यासाठी केलेला संपूर्ण खर्चही पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट बनली आहे. शेतकामांवर जगणाºया शेतमजुरांनाही काम नसल्याने घरखर्चाचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. गाई-म्हशीच्या दुधावर खर्च भागवायचा म्हटले तर वैरणीचा प्रश्न बिकट आहे. एकूणच, ग्रामीण अर्थकारणच विस्कटले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात हातात रुपयाही पडला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.