कोल्हापूर : चालू बिलाची थकबाकी असलेल्या कृषी पंपांची वीज कनेक्शन्स तीन महिने तोडू नयेत, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी घेतल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांकडे चालू बिलाची तब्बल ३७० कोटी रुपये थकबाकी आहे.आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोमवारी करवीर तालुक्यातील महे ग्रामस्थांनी पाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण कार्यालयात आंदोलन करून एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. राज्यभरातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड असल्यामुळे पिकांना आठवड्याला पाणी द्यावे लागत आहे.अशातच वीज कनेक्शन तोडल्यास हातात आलेले पीक वाळून जाण्याची भीती होती. या सगळ्याची दखल घेऊन शासनाने कनेक्शन तोडण्याच्या कारवाईस स्थगिती दिली.सध्या विजेच्या चालू बिलासाठी महावितरणची कोणतेही योजना नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करूनच वीजबिल भरून घ्यावे लागणार आहे. सप्टेंबर २०२० पूर्वीचे वीजबिल थकित असल्यास त्या शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सवलत आहे. परंतु त्यासही शेतकऱ्यांकडून जेमतेमच प्रतिसाद आहे.
- कोल्हापूर : १ लाख ४६ हजार कृषी ग्राहकांकडे ३८० कोटी थकबाकी. त्यातील १ लाख ९ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६७ कोटी ७१ लाख.
- सांगली : २ लाख ४० हजार कृषी ग्राहक. त्यांच्याकडे १२१९ कोटी रुपयांची थकबाकी. त्यातील १ लाख १५ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६८ कोटी.
चालू बिलाची थकबाकी
- कोल्हापूर : कृषी ग्राहक ३६ हजार : थकित चालू बिल - ९० कोटी
- सांगली : १ लाख २५ हजार : थकित चालू बिल : २८० कोटी.