कोल्हापूर : सध्या नोकरी, आरोग्यासह शिक्षण क्षेत्राचेही खासगीकरण सुरू आहे. कायमस्वरूपी रोजगार निर्मितीची हमी नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. नोटाबंदी निर्णय, जीएसटीची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी न केल्याने देशाचा विकास दर खालावला आहे. ही सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी रोजगार निर्मितीसह शेतीची पुनर्रचना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या विद्यमाने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेत ‘देशाची आर्थिक सद्य:स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते.
डॉ. मुणगेकर म्हणाले, गेल्या दहा वर्षांचा विचार करता गेल्या चार वर्षांत विकास दर कमी झाला आहे. त्याचे एक कारण म्हणजे नोटाबंदी होय. नोटाबंदीमुळे भारतामधील अर्थव्यवस्था सहा ते सात महिने ठप्प झाली. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटांना आळा घालणे आणि अतिरेकी कारवाई रोखणे या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यापैकी कोणते एकहीकारण या निर्णयामुळे साध्य झाले नाही. जीएसटी हा सर्वांत चांगला निर्णय आहे; मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली गेली नाही.
गेल्या तीन-चार वर्षांत रोजगाराची चर्चा केली जात नाही. मोठ्या रोजगारांमुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. मात्र, रोजगार निर्मिती होत नाही. लहान-लहान उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्याला उभारी देणे गरजेचे आहे. विरोधी पक्षांनी सत्ताधाºयांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, असे डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.याप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी आभार, तर प्रा. तेजस्विनी मुडेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पोवार, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश हिलगे, उपाध्यक्ष अशोक पर्वते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘गुजरात’ची कॉलनी बनेल...मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. ही ट्रेन फक्त गुजरातमधील व्यापाºयांच्या सोयीसाठी असेल. ती जर सुरू झाली तर महाराष्ट्र गुजरातमधील एक कॉलनी होऊन बसेल. या विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष काहीच बोलत नाहीत, असेही मुणगेकर म्हणाले.कोल्हापुरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे गुरुवारी ताराराणी विद्यापीठ आयोजित क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मार्गदर्शन केले. शेजारी एस. आर. पर्वते, प्राजक्त पाटील, डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. एस. एन. पवार, अॅड. प्रकाश हिलगे, आदी मान्यवर उपस्थित होते.