लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या पिकांसह जमिनीच्या पंचनाम्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी हे जागेवर जाऊन पंचनामे करणार आहेत. अद्याप नदी परिसरात पाणी असल्याने पंचनाम्याच्या कामाला गती येत नसली तरी दहा दिवसांत पंचनाम्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नजर अंदाजानुसार ५८ हजार ५०० हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, हजारो हेक्टर जमीन तुटून गेली आहे. हाता तोंडाला आलेली पिके गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. दरम्यान, शासनाने नुकसान झालेली पिके व जमिनीचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा तयार करायचा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान किती झाले? हे पाहिले जाणार आहे. त्यानुसार भरपाई मिळणार आहे. साधारणपणे दहा दिवसांत शेतीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. मात्र, अद्याप नदी, ओढ्यांच्या परिसरात पाणी असल्याने पंचनाम्यास अडथळा येत आहे.
महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही फारच कमी असते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे कर्ज असो अथवा नसो, त्याला नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळाली पाहिजे.
-प्रवीण कदम (शेतकरी, इंगळी)
शेतीचे पंचनामे सुरू झाले असून, गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक हे काम करत आहेत. पिकांबरोबरच जमिनीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून, साधारणपणे दहा दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकते.
-ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)