शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

कृषी विद्यापीठ ऊस व दुग्ध संशोधनाचे प्रमुख केंद्र करणार - डॉ. संजय पाटील यांचा निर्धार : तळसंदेतील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:18 AM

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा ऊस आणि दुग्ध व्यवसाय हा कणा आहे. ...

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूरच नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा ऊस आणि दुग्ध व्यवसाय हा कणा आहे. हा प्रदेश महाराष्ट्रात स्वाभिमानाने उभा आहे. त्यामागे साखर कारखानदारी व दूध व्यवसायातून आलेली सुबत्ता आहे. त्यामुळे तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठात या दोन व्यवसायांतील संशोधन व अद्ययावत ज्ञान मिळवून देणारे अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देणार असल्याचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या विद्यापीठाचे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते सकाळी १० वाजता व्हर्च्युअल पध्दतीने उद्घाटन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ पाटील बोलत होते.

तळसंदेतील ओसाड माळरान ते आता कृषी विद्यापीठ असा विकासाचा टप्पा घडविण्यात संजय पाटील यांची दूरदृष्टी, नियोजन महत्त्वाचे ठरले. एकदा एक काम मनावर घेतले की ते उत्तम पध्दतीनेच करून दाखवायचे, या त्यांच्या कार्यपध्दतीला धरूनच या विद्यापीठाची वाटचाल होणार आहे. आगामी दहा वर्षांचा विद्यापीठ विकासाचा रोडमॅप डोळ्यासमोर ठेवूनच या विद्यापीठाचा पाया घातला आहे. या विद्यापीठामुळे दक्षिण महाराष्ट्राच्या कृषी, तंत्रज्ञान, शैक्षणिक विकासातही महत्त्वाची भर घातली आहे. विद्यापीठाच्या उभारणीबद्दल सांगताना डॉ. पाटील म्हणाले, सध्या तळसंदे येथील कृषी महाविद्यालयात चार हजार विद्यार्थी उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत. तिथे मुला-मुलींचे चांगले वसतिगृह आहे. बी. एस्सी. ॲग्री, बी. टेक ॲग्रिकल्चरल आणि कृषी पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे कृषी शिक्षणाची पार्श्वभूमी, उत्तम वातावरण आहे. तिथे आता तिथे कृषी विद्यापीठ आकार घेत आहे. यंदापासूनच किमान ३० अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन केले आहे. येत्या दहा वर्षांत या विद्यापीठाची विद्यार्थी संख्या १६ हजारांवर न्यायचे नियोजन करूनच आम्ही विद्यापीठाचे उद्घाटन करत आहोत.

डॉ. पाटील म्हणाले, हे फक्त कृषी विद्यापीठ नाही. त्याला आम्ही तंत्रज्ञान अभ्यासक्रमांचीही जोड देत आहोत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला बी.एस्सी. झाल्यानंतर एम. बीए. करायचे असेल, तर त्यास याच विद्यापीठात ते करता येईल. एखाद्याला कृषी शिक्षण घेऊन शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करण्याचे ज्ञान मिळवायचे असेल, तर त्याचेही शिक्षण त्यास या विद्यापीठात मिळू शकेल. नव्या काळानुसार व गरजांनुसार समाजाची जी गरज आहे, ती ओळखूनच विद्यापीठाच्या शिक्षणाचा पॅटर्न विकसित करणार आहोत. शिक्षण एका बाजूला आणि समाजाची गरज दुसऱ्या बाजूला ही दरी तयार होणार नाही, अशाच शिक्षणावर आम्ही भर देऊ. त्यातही दक्षिण महाराष्ट्राचा गाभा असलेल्या ऊस व दूध व्यवसायाला पूरक शिक्षण व संशोधनास प्राधान्य देऊ. दक्षिण महाराष्ट्राच्या शेतीच्या गरजा भागवणारे शिक्षण देऊ शकणारे केंद्र म्हणून आम्ही या विद्यापीठाकडे पाहत आहोत. या प्रदेशाचा दूध उद्योग हा मुख्य उद्योग होत आहे. त्यासाठी डेअरी डेव्हलपमेंट, व्हेटरनरी सायन्स शिक्षणाची गरज आहे. ती व्यवस्था आम्ही उभी करू. शेतकऱ्याची नवी पिढी आता शेतीत नवे काही करू पाहत आहे. शिक्षण, ज्ञान घेऊन शेतीत उतरणारे तरुण शेतकरी गावोगावी तयार होत आहेत. तो दूध धंद्यापासून फूलशेती, भाजीपाला, फळशेती, डेअरी फार्म ते आले लागवडीमध्येही रस घेत आहे. त्याला ज्या ज्ञानाची, संशोधनाची, प्रात्यक्षिकांची आणि प्रशिक्षणाची गरज असेल, ते देणारे हे विद्यापीठ प्रमुख केंद्र बनवू.

सातवे विद्यापीठ..

डी. वाय. पाटील यांच्या नावे महाराष्ट्रात हे सातवे विद्यापीठ आता होत आहे. सुरुवातीची तीन विद्यापीठे मुंबई, पुणे व कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहेत. त्यानंतरची लोहगाव, आकुर्डी, तळेगावला अभियांत्रिकी शिक्षणाशी संबंधित, तर आता सातवे तळसंदे येथे कृषी शिक्षणाशी संबंधित विद्यापीठ होत आहे.

१२ हजार ट्रॉली मातीतून मळा..

तळसंदे हे वाठारपासून पश्चिमेकडील बाजूला सहा किलोमीटरवर असणारे हे नऊ हजार लोकवस्तीचे गाव आहे. तिथे ३३ वर्षांपूर्वी माळरानावर संजय पाटील यांनी जमीन घेतली. २०५ एकराचे क्षेत्र आहे. कशीबशी इंचभर माती असताना मुळात शेतीची प्रचंड आवड असणाऱ्या संजय पाटील यांनी तिथे १२ हजार ट्रॉली माती आणून मळा फुलवला. पुढे १९९४ ला त्यांनी सहा किलोमीटर पाईपलाईन घालून वारणा नदीतून पाणी आणून हा मळा हिरवागार गेला.