नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देणे, माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफी करणे, आमदार विकास निधीतून रुग्णवाहिका व शववाहिका खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जागेवर लाईट, पाणी, आदी सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील सार्वजनिक स्वच्छता करणे, १४व्या वित्त आयोग अनुदान व्याज रकमेतून कोरोना काळात काम केलेल्या स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व नगरपरिषद आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अपेक्षा हॉटेल रस्ता, महावीरनगरमधील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, मातंग समाजाच्या मागणीप्रमाणे जागेसाठी ना हरकत दाखला देणे, आदी विषयांस यावेळी बहुमताने मंजुरी देण्यात आली. सन २०१७-१८ व २०१८-१९ सालातील लेखापरीक्षण अनुपालन अहवालाबाबत सविस्तर माहिती देऊन हा अहवाल पुढील सभेसमोर ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात अत्यंत सुंदर नियोजन करून शहर कोरोनामुक्त करण्यात यशस्वी झालो आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका व नगरपरिषद कर्मचारी यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रत्येकी एक हजार देण्यात येणार आहे. तसेच आशा सेविका यांना अद्याप शासनाचे मानधन न मिळाल्याने नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी स्वतःजवळील प्रत्येक आशा सेविका यांना यापूर्वी रक्कम दिली होती. यावेळी शासकीय अनुदानातून ही रक्कम देण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. शहरातील महावीरनगर येथील चांदी उद्योजक राजेंद्र शेटे यांनी त्यांच्या घराशेजारील रस्ता स्वखर्चातून कॉंक्रिटीकरण करून घेण्याबाबत मागणी केलेली आहे. यापूर्वी त्यांनी स्वखर्चातून स्मारक शेजारी स्वच्छतागृह बांधलेले आहे. स्मशानभूमी दुरुस्ती करून घेतलेली आहे, असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. सामाजिक बांधीलकी म्हणून हा रस्तासुद्धा करण्याची त्यांनी तयारी दर्शविल्याबद्दल सभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
हुपरीत अहिल्यादेवी होळकर स्मारक विकसित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:32 AM