विश्वास पाटील कोल्हापूर : पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवून विसरून गेल्यानंतर आता राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. मागील पाच वर्षांच्या राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील तब्बल ७८ पुरस्कारांची घोषणा केली. गंमत म्हणजे आता २०१५-१६ ते २०१९-२० पर्यंतच्या पाच वर्षांची घोषणा झाली आहे.महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांना व संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांच्या कामाला राजमान्यता मिळावी या चांगल्या हेतूने हे पुरस्कार खरेतर प्रतिवर्षी दिले जायला हवेत. परंतु, त्याकडे सरकारी पातळीवर फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्रस्ताव दाखल करण्यापासून त्यात राजकीय वशिलेबाजी जोरात होते. कांहीवेळा तरी मागील वर्षाच्या पुरस्कार विजेत्या महिलेचा प्रस्ताव घेऊन त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्तीचे नाव घालून सादर करण्याचे प्रकार घडले आहेत.
त्यामुळे चांगले काम करणाऱ्या महिला या पुरस्कारांकडे फारशा वळत नाहीत. जे प्रस्ताव सादर होतात त्यांचेही मूल्यमापन नीट करून त्यांची घोषणा वेळच्या वेळी केली जात नसल्यानेच २०१५-१६ पासूनचे प्रस्ताव धूळ खात पडले होते. आता पुरस्कारांची घोषणा तरी झाली; परंतु त्याचे वितरण कधी होणार याबद्दलही शासनाने स्पष्ट केलेले नाही.
राज्यस्तरीय पुरस्कार : हर्षदा विद्याधर काकडे (शेवगांव, अहमदनगर), वनमाला परशराम पेंढारकर मंगरुळपीर (वाशिम), शोभा गुंडप्पा पारशेट्टी (शिवाजी चौक लातूर), रजनी शामराव मोरे (तुकुम. चंद्रपूर)- २०१९-२० ला प्रस्ताव नाही.
विभागस्तर : (ज्या वर्षी प्रस्ताव आले त्याच वर्षाची घोषणा).पुणे : शिशू आधार केंद्र कोल्हापूर, शिवाजीराव पाटील संस्था सैनिक टाकळीकोकण विभाग : वनवासी संघ, उसरोली, मुरूड, सहेली ग्रुप चिपळूण, आश्रय फाऊंडेशन पनवेलनाशिक : यमुनाबाई महिला मंडळ, धुळे, चिराईदेवी अर्थे, ता. शिरपूर, स्नेहालय अहमदनगरअमरावती : छत्रपती शिवाजी वेल्फेअर सोसायटी मूर्तीजापूरऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुरल संस्था कुरुदा ता. वसमत
जिल्हास्तरकोल्हापूर : डॉ. स्वाती काळे, बुधवार पेठ कोल्हापूर, डॉ. अंजना जाधव पेठवडगांवसांगली : शोभाताई होनमाने देवराष्ट्रे, सविता डांगे, उरुण, इस्लामपूर, डॉ. निर्मला पाटील, शिवाजीनगर सांगली.रत्नागिरी : प्रा. बीना कळंबटे मांडवी रत्नागिरी, सुरेखा गांगण चांदेराई रत्नागिरी, आसावरी शेट्ये शिरगांव.सातारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून पाच वर्षांत प्रस्तावच नाही.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे. विभागीय स्तरावरील पुरस्कार २५ हजार रुपये आणि जिल्हा स्तरावरील १० हजार रुपयांचा आहे. त्याशिवाय सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रही देण्यात येते.