कोल्हापूर : महिला दिनानिमित्त फिफाच्या पाठिंब्याने ऑल इंडिया फुटबाॅल फेडरेशन व ‘विफा’तर्फे महिलांच्या फुटबाॅलचा अधिक विकास व्हावा, याकरिता मुंबईतील कुपरेज मैदानावर सोमवारी महिला प्रशिक्षकांकरिता ‘ई’ लायसेन्स प्रशिक्षण शिष्यवृत्ती कार्यक्रमास सुरुवात झाली. उद्घाटन ऑल इंडिया फुटबाॅल असोसिएशन महिला समितीच्या सदस्या व वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनच्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे व फिफा सतरा वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धा २०२२च्या स्थानिक संयोजन समिती संचालिका रोमा खन्ना यांच्याहस्ते झाले. यानिमित्त अधिकृत टी-शर्टचे अनावरणही झाले.
‘फिफा’च्या पाठिंब्यामुळे सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात विविध शहरांतील २१ इच्छुक महिला प्रशिक्षकांनी ई-परवाना अभ्यासक्रमात सहभाग घेतला. चार दिवस चालणाऱ्या या अभ्यासक्रमात फुटबाॅल प्रशिक्षणासंदर्भातील बारकाव्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, परभणीसह इतर जिल्ह्यांतही विफाच्या पुढाकाराने ‘ई’ लायसेन्स प्रशिक्षण घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे हे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले आहे.
स्पर्धा संचालिका खन्ना म्हणाल्या, सतरा वर्षांखालील फिफा फुटबाॅल स्पर्धेनिमित्त ई-लायसेन्स प्रशिक्षणास सुरुवात होणे आनंदाची बाब आहे. अधिक महिला प्रशिक्षक व मुली, स्त्रिया खेळात असणे आवश्यक आहे. पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या फिफा सतरा वर्षांखालील मुलींच्या फुटबाॅल स्पर्धेनिमित्त या प्रशिक्षण कार्यक्रमास विशेष महत्त्व आहे. यावेळी विफाचे सचिव साऊटर वाझ व अन्य पदाधिकारी, प्रशिक्षक उपस्थित होते.
फोटो : ०८०३२०२१-कोल-मधुरिमाराजे०१
आेळी : मुंबईतील कुपरेज मैदानावर एआयएफएफ व विफा तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी ‘ई’ लायसेन्स प्रशिक्षण कार्यक्रमात टी-शर्टचे अनावरण मधुरिमाराजे व रोमा खन्ना यांच्याहस्ते झाले.
फोटो : ०८०३२०२१-कोल-मधुरिमाराजे०२
आेळी : मुंबईतील कुपरेज मैदानावर एआयएफएफ व विफातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी ‘ई’ लायसेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मधुरिमाराजे व रोमा खन्ना यांच्याहस्ते झाले. यावेळी विफा सचिव साऊटर वाझ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.