प्रवीण देसाई
कोल्हापूर : या लोकसभा निवडणुकीसाठी क्रिटिकल (गंभीर) मतदान केंद्रे निवडणूक आयोगाने निर्धारित केली आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरासह उपनगरे व इचलकरंजीसह आसपासच्या गावांमधील ७१ केंद्रांचा समावेश आहे.
जिल्हा निवडणूक आयोगाने या केंद्रांची यादी तयार केली असून, या केंद्रांवर अधिक लक्ष दिले आहे. बहुधा पहिल्यांदाच या पद्धतीने महत्त्वाच्या केंद्रांकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे दिसत आहे.एखाद्या मतदान केंद्रावर ९० टक्के पेक्षा जास्त मतदान होणे, एखाद्या उमेदवाराला ७० टक्केपेक्षा अधिक मतदान होणे, एखाद्या केंद्रावर कुटुंबाशी संबंध नसलेल्या एकल मतदारांचे मोठ्या प्रमाणातील मतदान, तसेच मतदान केंद्रांवरील फेरमतदान अशा निकषांखाली क्रिटिकल मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ७१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर शहर व इचलकरंजी परिसरातील केंद्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. जिल्हा निवडणूक विभागाने आयोगाच्या निर्देशानुसार या केंद्रांवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
याबाबतचा आढावा घेण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. क्रीटिकल केंद्रांबाबत आयोगाकडूनही माहिती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याबाबत आयोगाकडून आलेल्या निर्देशानुसार या केंद्रांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. ही केंद्रे अधिक गंभीर होऊ नयेत, यादृष्टीने निवडणूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वरचेवर संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ७१ केंद्रे ही क्रिटिकल केंद्रे म्हणून निश्चित करण्यात आली आहेत; यासाठी असणाऱ्या निकषांनुसारच ती अंतिम करण्यात आली आहेत. यासंदर्भात आढावा घेण्याचे काम सुरू आहे.- सतीश धुमाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
केंद्रांची प्रातिनिधिक नावे अशी
- वीर सावरकर हॉल (राजलक्ष्मीनगर, कोल्हापूर शहर)
- एस्तर पॅटर्न स्कूल (ताराबाई पार्क, कोल्हापूर शहर)
- महावीर इंग्लिश मीडियम स्कूल (सुर्वेनगर, कोल्हापूर शहर)
- विद्यामंदिर शांतीनगर (पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
- अण्णासाहेब शिंदे विद्यालय (लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर शहर)
- विवेकानंद कॉलेज (नागाळा पार्क, कोल्हापूर शहर)
- तात्यासाहेब मुसळे विद्यालय, (इचलकरंजी)
- विद्यामंदिर टोप (टोप, ता. हातकणंगले)
- एम. आर. हायस्कूल (गडहिंग्लज)