कोल्हापूर : ऐन दिवाळीत शहरात सोमवारी (दि. १३) रात्री दोन घटनांमध्ये दोघांचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली. फुलेवाडी परिसरात शेतकरी धाब्याजवळ तीन हलेखोरानी पाठलाग करून कोयता, एडका आणि तलवारीचे १६ वार करून सराईत गुंड ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याचा खून केला. तर मंगळवार पेठेत बालगोपाल तालमीजवळ सतीश बाबुराव खोत (वय ५८, र. मंगळवार पेठ) या पान टपरीचालकाच्या डोक्यात काठीने मारहाण झाल्याने त्यांचा खून झाला. या दोन्ही घटनांनंतर सोमवारी रात्री सीपीआरच्या अपघात विभागासमोर मोठी गर्दी झाली होती.
याबाबत अधिक माहिती आशी की, संपूर्ण शहर दिवाळीचा सण साजरा करण्यात दंग असताना शहरातील दोन खुनाच्या घटना घडल्या. हाणामारीचे गुन्हे दाखल असलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत ऋषीकेश नलवडे हा फुलेवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवण करण्यासाठी निघाला होता. मित्राच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जाताना काही तरुण पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी मारली. आपल्या पोरांना बोलवून घे, असे मित्राला सांगून तो अंधारातून पळत सुटला. तोंडाला मास्क लावलेल्या तिघांनी ऋषीकेशचा पाठलाग केला. बंद पडलेल्या गुऱ्हाळगृहाजवळ ऋषीकेशला खाली पाडून त्याच्यावर तलवार, चाकू, एडकाने सपासप वार केले. मान, हात, पाठीवर १६ वार झाले. प्रतिकार करताना त्याच्या हाताची बोटेही तुटली. तो मेल्याची खात्री करूनच हल्लेखोर निघून गेले.
काही वेळातच ऋषिकेशचे मित्र घटनास्थळी पोहोचले. रक्ताने माखलेल्या ऋषीकेशला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऋषिकेशचा खून झाल्याचे समजताच त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. वर्चस्ववाद आणि टोळी युद्धातून खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे.
सीपीआरमध्ये पोलिसांचा फौजफाटा खुनाच्या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यासह पथक सीपीआर lमध्ये दाखल झाले. मृताचे नातेवाईक आणि मित्रांची गर्दी वाढल्याने पोलीसांनी बंदोबस्त वाढवला.
मंगळवार पेठेत पाणटपरी चालकाचा खून मंगळवार पेठेत बालगोपाल तालमीजवळ राहणारे पानटपरी चालक सतीश बाबुराव खोत हे घरासमोर रात्री नऊच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी त्यांचा एका मित्रासोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. यातून मित्राने काठी आणून झोपलेले खोत यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. मारहाणीत डोके फुटून खोत यांचा जागीच मृत्यू झाला. गल्लीतील लोकांनी रिक्षातून खोत यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.