राम मगदूमगडहिंग्लज : नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आघाडीवर असणाऱ्या ऐनापूर ग्रामपंचायतीने गावातील लेकींच्या लग्नात 'माहेरचा आहेर' म्हणून ग्रामपंचायतीतर्फे कन्यादानाची साडी भेट देण्याचा ग्रामसभेत शनिवारी (३१) घेतला. अध्यक्षस्थानी प्रभारी सरपंच बाळासाहेब देसाई होते.३ हजार लोकवस्तीचे हे गाव गडहिंग्लज-आजरा मार्गावर आहे. ग्रामस्थांची वैचारिक बैठक पक्की पुरोगामी आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले मुस्लिम क्रांतीकारक इब्राहिम मकानदार यांचे नाव माध्यमिक शाळेला देण्यात आले आहे.विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि साडीचोळी देवून गावातील विधवा भगिनींचा ग्रामपंचायतीतर्फे सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी विधवा भगिनी पूनम देसाई यांना सरपंचपदाचा तर इंदिरा कांबळे यांना उपसरपंचपदाचा बहुमान देण्यात आला.गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनासाठी हिरण्यकेशी नदीकाठावर ग्रामपंचायतीतर्फे कृत्रिम कुंड बांधण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रमही सुरू केला आहे. अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची रक्षा नदीत न सोडता ती झाडांनाच घातली जाते.सरकारी प्राथमिक शाळेला सर्व भौतिक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करण्यात ग्रामपंचायतीचा नेहमीच पुढाकार आहे. त्यामुळे शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे.जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळयोजनेत प्रत्येक कुटुंबाला समान पाणी मिळावे यासाठी 'फेरुल व्हॉल्व्ह'बसविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसेच वीजेच्या बचतीसाठी ही नळयोजना सौरऊर्जेवरच चालविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे.सभेला ग्रामपंचायत सदस्य समिना मकानदार, सविता चौगुले, प्राचना देसाई, लहू दड्डीकर व धोंडीबा कांबळे, पांडुरंग दड्डीकर, राजू कुराडे, मनोहर देसाई, सदाशिव पाटील, सदाशिव देसाई, विलास देसाई, बाबुराव कागवाडे, अशोक शिंदे, संजय होडगे,तुकाराम जाधव,शिवाजी देसाई, ग्रामसेविका सोनाली पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ‘आयएसओ मानांकन’आयएसओ मानांकनप्राप्त गडहिंग्लज तालुक्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे. पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीसाठी क्यूआर कोड पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. व्यसनमुक्तीसाठी गावात दारू व गुटखा बंदी करण्यात आली असून आठवडा बाजाराच्या माध्यमातून गावच्या अर्थकारणाला गती देण्यात आली आहे.
ज्येष्ठ ग्रामपंचायतीतर्फे प्रा. किसनराव कुराडे, अॅड. सुरेश कुराडे, प्रा. अनिल कुराडे, अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. गटविकास अधिकारी शरद मगर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य आहे. विविध उपक्रमातून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - बाळासाहेब देसाई, प्रभारी सरपंच, ऐनापूर.