(राजू शेट्टी, भगवान काटे व महादेवराव महाडिक यांचे फोटो वापरा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : किणी टोलनाक्यावर दूध दर आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चाची हवा गेली काय भगवानराव, अशी गंमत करणाऱ्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांना संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ब्रँडची जादू आठवल्याची प्रतिक्रिया संघटनेच्या कार्यकर्त्यांतून बुधवारी उमटली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच तो १९ जुलै २०१८ चा व्हिडिओ व्हायरल करून धुराळा उडवून दिला. गोकुळच्या निवडणुकीत शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर या घडामोडी झाल्या.
घडले ते असे : दूध दर वाढीसाठी स्वाभिमानीने २०१८ मध्ये आंदोलन पुकारले होते. त्याचा भाग म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे किणी टोलनाक्यावर वाहने अडवीत होते. तेव्हा महाडिक एकटेच कारमधून निघाले होते. काटे यांनी ते जात असलेले पाहून आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंती केली. त्यावर महाडिक म्हणाले, भगवानराव मी करायची त्यावेळी आंदोलने केली आहेत. ती आता वेळ नाही. संघटनेचा जन्म व्हायलाही मीच कारणीभूत आहे. वाळवा-शिराळ्यापासून संघटनेला मोठे करायला या महाडिकाएवढी कुणीच मदत केलेली नाही. मोर्चा सुरू झाला आणि माणसे तरी दिसत नाहीत, मोर्चाची हवा गेली की काय भगवानराव....? असे महाडिक गंमतीने म्हणाले होते. त्यावर काटे यांनी मोर्चा आता सुरू झाला आहे, हवा झाली की तुम्हाला फोन करून बोलावतो असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. संघटनेतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. महाडिक यांनी केलेली टिपणी संघटनेच्या जिव्हारी लागली होती. त्याच संघटनेची आता तीन वर्षांनंतर महाडिक यांना आठवण झाल्याची व शेट्टी ब्रँडची किंमत कळल्याची प्रतिक्रिया बुधवारी शेट्टी यांनी सत्तारूढ आघाडीस पाठिंबा दिल्यानंतर उमटली.
प्रतिमेचे पाठबळ..
स्वाभिमानी संघटनेचा दूध संघ असल्याने गोकुळच्या निवडणुकीत संघटनेचे म्हणता येतील असे फारसे ठरावधारक
नाहीत; परंतु शेट्टी यांनी दूध उत्पादकांसाठी वेळोवेळी केलेली आंदोलने यामुळे उत्पादकांत त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे. त्यामुळे ठरावधारक नसले तरी शेट्टी व संघटनेच्या प्रतिमेचा सत्तारूढ गटाला किमान काही फायदा होऊ शकतो.