समीर देशपांडे
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्याच्या सफारीसाठी आता एक वातानुकूलित बस आणि दोन जीपही उपलब्ध झाल्या आहेत. याआधीच्या बसमधून आतापर्यंत १६०० जणांनी प्रवास केला असून या अभयारण्याची श्रीमंती डोळ्यात साठवली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठबळावर आता ही नवी वाहने नागरिकांच्या सेवेत तैनात केली जाणार आहेत.
१ सप्टेंबर २०२१ पासून राधानगरी अभयारण्य जंगल सफारी योजनेची सुरूवात करण्यात आली होती. प्रत्येकी ४०० ज्यामध्ये एकवेळचा चहा आणि नाश्ता समाविष्ट आहे अशी ही योजना आहे. सकाळी कोल्हापूरहून सात वाजता निघून राधानगरी, दुपारी दाजीपूर, राऊतवाडी धबधबा, मधल्या काळात फुलपाखरू उद्यानाला भेट, राधानगरी धरण, माळेवाडी धरण येथे नौकानयन असे या सहलीचे स्वरूप आहे.ही सहल सुरू केल्यानंतर आतापर्यंत १६०० जणांनी याचा लाभ घेतला आहे. यामध्ये अनाथ, दिव्यांग मुलामुलींना ही सहल घडवून आणण्यात आली आहे. तारळे येथे काका आठवले वसतिगृहामध्ये ही या उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येते. या सहलीला मिळणारा प्रतिसाद पाहता आता आणखी एक वातानुकूलित बस घेण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळे जरी ही सफारी बंद असली तरी परवानगी मिळाल्यानंतर लगेचच ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
शासनाच्या जीपमधून फिरा जंगल
येथून सहलीवर गेल्यानंतर दाजीपूर जंगलात फिरण्यासाठी तेथे स्थानिकांच्या जीप उपलब्ध आहेत. परंतु आता शासनानेच यासाठी दोन जीप घेतल्या असून त्या माध्यमातून आता जंगल सफारीचा अनुभव घेता येणार आहे.
या सहलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणून आणखी एक वातानुकूलित बस आणि दोन जीप घेण्यात येणार आहेत. परवानगी मिळाल्यानंतर ही सहल पुन्हा सुरू केली जाणार आहे. दर मंगळवारी ही सहल बंद ठेवली जाते तर आठवड्यातील एक दिवस दिव्यांग व अनाथाश्रमातील मुलांसाठी राखीव ठेवण्यात येतो. - विशाल माळी, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव कोल्हापूर