कोल्हापूर : दोन साखर कारखान्यांमधील १५ किलोमीटर हवाई अंतराची अट लवकरच काढून टाकणार असल्याची घोषणा राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, शनिवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. कारखान्याशेजारी स्पर्धक उभारल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा होणार नसल्याचे सांगत सध्या ऊसदरासाठी कारखान्यांना केंद्र सरकारकडून सॉफ्ट लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, विक्रमसिंह घाटगे ‘एफ.आर.पी.’पेक्षा जास्त दर देऊ शकतात, मग इतर कारखाने का देत नाहीत. अडचणीतील सहकारी कारखाने खासगी झाले की फायद्यात येतात, हे कसे घडते, असा सवाल करीत नजीकच्या काळात दोन साखर कारखान्यांमधील १५ किलोमीटर हवाई अंतराची अट काढून टाकणार आहे. सहकारी कारखान्यांच्या शेजारी खासगी कारखाना आल्याशिवाय स्पर्धा निर्माण होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सहकार बॅँकांच्या पुढे एन.पी.ए.चा मोठा प्रश्न असून, तो कमी करण्यासाठी एकरकमी परतफेड योजनेला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक सूतगिरणींच्या चौकशीला स्थगिती दिलेली आहे. ती उठवून ६७५ संस्थांची पुन्हा चौकशी सुरू करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे; पण हंगामाच्या तोंडावर बैठक घेऊन मार्ग निघत नाही, यासाठी वर्षभर प्रत्येक महिन्याला बैठका घेऊन अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर काही कारखाने उसाचा काटामारी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवून त्यांची वारंवार तपासणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. मळी नियंत्रणमुक्तीचा निर्णय येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाईल, त्याचबरोबर ऊसतोडणी मजुरांसाठी महामंडळाची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण उपस्थित होते. सहकाराला काय धाड भरली? सहकार तत्त्वावर सुरू असताना कारखाना सतत आजारी असतो, तोच कारखाना खासगी मालकाने घेतला की दोन वर्षांत नफ्यात येतो. दालमिया शुगर्स दोन वर्षांत सहवीज प्रकल्पासह आघाडीवर आहे. मग सहकारी कारखानदारांना काय धाड भरली, असा संतप्त सवाल मंत्री पाटील यांनी केला. बदली, बढती आणि भरतीसाठीच गर्दी ! गेले दोन दिवस मंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे जनतेशी सुसंवाद साधला. यामध्ये जनतेने कोणती गाऱ्हाणे मांडली, याबाबत विचारणा केली असता, बदली, बढती व भरती यासाठीच अनेकांनी गर्दी केल्याचे पाटील यांनी सांगितले. यानंतरच जिल्हा बॅँकेची निवडणूकजिल्हा बॅँक व ‘गोकुळ’ या संस्थांशी संलग्न प्राथमिक संस्थांच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांत पूर्ण होतील. त्यानंतरच या शिखर संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
कारखान्यांमधील हवाई अंतराची अट काढून टाकणार
By admin | Published: November 23, 2014 12:30 AM