संतोष भिसे ।सांगली : हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे.स्थानिक महापालिकांच्या मदतीने आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. नागपूर येथील निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई आयआयटीने आराखडा तयार केला आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद यासह १७ शहरांतील हवेतील प्रदूषणाच्या तीव्रतेची नोंद घेऊन त्यावरील उपाय आराखड्यात सुचवले आहेत. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी करायची आहे. पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने महिन्याभरापूर्वी तो आराखडा शासनाला सादर केला. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आजअखेर दोन उच्चस्तरीय बैठकाही झाल्या आहेत.या शहरांसाठी आराखडाराष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत सतरा शहरांत कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक व उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीत तेथील महापालिकांचाही सहभाग असेल.
हे असतील उपायहवेचा दर्जा सुधारण्यासाठी वृक्षारोपणाची घनता वाढवणे, धुळीवर नियंत्रणासाठी कच्च्या रस्त्यांची संख्या कमी करुन पक्के डांबरी रस्ते तयार करणे, वनाच्छादीत क्षेत्र वाढवणे, बांधकामांवर नियंत्रण तसेच त्यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणे असे काही उपाय आराखड्यात आहेत. रस्ते आणि वाहतुकीचे व्यवस्थापन, पार्किंगसाठी राखीव क्षेत्र, रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, सीएनजी इंधनाच्या वापरला प्रोत्साहन, विद्युत आणि सीएनजीवर चालणाºया वाहनांचा वापर वाढवणे या मुद्द्यांचही आराखड्यात समावेश आहे.
‘शहरांची हवा स्वच्छ आणि आरोग्यदायी रहावी यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध उपाययोजना करत आहे. हवेच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवून आहे. ती सुधारण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यात सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यामुळे हवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल’.- नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी